उद्धव ठाकरेंचे पार्टनर रवींद्र वायकर जेलमध्ये जाणार – किरीट सोमय्या यांचा आरोप

मुंबई, ४ मार्च २०२३: ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय रवींद्र वायकर यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले. वायकर हे उद्धव ठाकरे यांचे पार्टनर असून, त्यांनी मुंबई महापालिकेच्या दोन लाख वर्ग फूट जमिनीवर ताबा मारून ५०० कोटींचं पंचतारांकित हॉटेल उभारलं जात आहे, या प्रकरणात त्यांना जेलमध्ये जावे लागणार आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

मुंबईत ते ते पत्रकार परिषदेत बोलत होते. वायकर यांनी मातोश्री स्पोर्टस ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींचा घोटाळा केला आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेले खुले क्रीडांगण व गार्डनसाठी असलेल्या जागेवर रवींद्र वायकर यांनी कब्जा केला आहे. त्या जागेवर दोन लाख वर्ग फुटांचं पंचतारांकित हॉटेल बांधण्याची सुरुवात केली आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात या जमिनीवर हे बांधकाम सुरू आहे. या हॉटेलची किंमत ५०० कोटी इतकी होत असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.

रवींद्र वायकर यांनी मुंबईतील जनतेसाठी आरक्षित असलेले क्रीडांगण व गार्डनच्या जागेवर त्यांच्या सुप्रीमो कंपनीद्वारे आधी सुप्रीमो बँक्वेट बांधलं. येथील बागेची रेडी रेकनरनुसार ४ कोटी किंमत होती. मात्र, वायकर यांनी हा भूखंड तीन लाख रुपयांना खरेदी केला. गेली अनेक वर्ष या जागेवर लग्न, पार्टी असे अनधिकृत व्यवहार रवींद्र वायकर करत आहेत, असा आरोपही सोमय्या यांनी केला.
महानगरपालिका, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीव नगर विकास विभागाने या हॉटेलचं बांधकाम तत्काळ थांबवावं, अशी मागणीही किरीट सोमय्यांनी केली. सोमय्यांच्या या गंभीर आरोपानंतर उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय रवींद्र वायकरही तुरुगांत जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणावर महापालिका काय निर्णय घेणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप