पिंपरी-चिंचवडकरांचा शास्तीकर पूर्ण माफीचा ‘जीआर’ अखेर आला!
पिंपरी-चिंचवड, 03 मार्च 2023: पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतधारकांवर लादलेला शास्तीकर पूर्ण माफ करण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली होती. त्याला पूर्णत्व मिळाले आहे. नागपूर येथे झालेल्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. मात्र, तसा ‘जीआर’ निघाला नव्हता. अखेर शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने पूर्णमाफ केल्याचा ‘जीआर’ राज्य सरकारने काढला आहे. गेल्या १४ वर्षांपासूनचा शास्तीकराचा प्रश्न आता कायमस्वरुपी सुटला आहे.
भारतीय जनता पार्टीचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि विद्यमान शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी शास्तीकर माफीसाठी राज्य सरकारकडे यशस्वी पाठपुरावा केला. अखेर पिंपरी-चिंचवडकरांच्या लढ्याला यश मिळाले.
नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्तीकर माफीची घोषणा केली होती. आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडकरांची बाजू सक्षमपणे सभागृहात मांडली होती. त्यामुळे शहरातील सुमारे १ लाख मिळकतधारकांना दिलासा मिळाला आहे.
**
निवडणुकीची घोषणा खरी ठरली…
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रचार सभेत शास्तीकराचा ‘जीआर’ लवकरच काढण्यात येईल, अशी घोषणा केली होती. गुरुवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप विजयी झाल्या. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारने ‘जीआर’ प्रसिद्ध केला. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या कामगिरीवर सर्वसामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
***
प्रतिक्रिया :
गेल्या १४ वर्षांपासून पिंपरी-चिंचवडकरांच्या मानगुटीवर शास्तीकराचा बोजा लादण्यात आला होता. त्यामुळे सुमारे १ लाख मिळकतधारकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात शास्तीकरण पूर्ण माफीची घोषणा झाली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करतो. शास्तीकर माफीच्या लढ्यामध्ये मोठे योगदान देणारे दिवंगत लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी आपआपल्या परीने पुढाकार घेतला. त्या सर्वांचे धन्यवाद देतो.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप