भाजपकडून शासकीय यंत्रणांचा व संस्थांचा गैरवापर – शरद पवार यांचा आरोप

पुणे, २२ फेब्रुवारी २०२३: भाजपकडून शासकीय यंत्रणांचा आणि संस्थांचा गैरवापर केला जात आहे. भाजप नेतृत्वाला विरोध करणार्‍या राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्रास दिला जातो. निवडणुक आयोगसुद्धा एकाचा पक्ष दुसर्‍याला देण्याचा पक्षपाती निर्णय घेत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

भाजपच्या राजवटीला विरोध करण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना मतदान करून विजयी करावे, असे आवाहनही पवार यांनी केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या अल्पसंख्यांक मेळाव्यात शरद पवार बोलत होते. महात्मा फुले पेठेतील सावित्रिबाई फुले स्मारक येथे आयोजित केलेल्या या मेळाव्यास रविंद्र धंगेकर यांच्यासह राज्यसभा सदस्या अ‍ॅड. वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, आ. अतुल बेनके, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी कासम शेख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे, माजी नगरसेवक रविंद्र माळवदकर, उस्मान हिरोली आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विविध सामाजिक संघटनांनी धंगेकर यांना आपला पाठींबा जाहीर केला.

पवार म्हणाले, भाजप हा एक असा पक्ष आहे, जो सातत्याने समाजाच्या बंधुत्वावर व एकोप्यावर हल्ला चढवत आहे. हा पक्ष सत्तेचा गैरपावर करत असून देशाचा कारभार हुकुमशाही पद्धतीने सुरू आहे. दिल्ली महापालिकेत ‘आप’कडे बहुमत असतानाही मागील तीन महिन्यापासून तेथे महापौर पदाची निवडणूक जाहीर करूनही घेतली नाही. शेवटी न्यायालयाने आदेश दिल्यानंतर महापौर पदाची निवडणुक घेण्यात आली आणि त्यात ‘आप’चा महापौर झाला.

काही दिवसांपूर्वी निवडणुक आयोगाने निर्णय दिला, असा निर्णय निवडणुक आयोगाने यापूर्वी कधीही दिला नव्हता. यापूर्वी आमता आणि काँग्रेसचाही वाद झाला. निवडणुक आयोगाने आम्हाला काँग्रेस नाव वापरायला परवानगी दिली मात्र, काँग्रेसचे चिन्ह काँग्रेसलाच ठेवले. शिवसेनेचा जन्म महाराष्ट्रात झाला, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर दिली. आता मात्र, निवडणुक आयोगाने एका पक्ष आणि चिन्ह दोऩ्ही गोष्टी दुसर्‍यालाच देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा पद्धतीचा कारभार यापूर्वी कधीही झालेला नाही. राज्यघटनेला अनुसरून निर्णय घेतले जात नाहीत.
त्यामुळे भाजपला धडा शिकवण्यासाठी ही पोट निवडणुक प्रमुख भूमिका बजावणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे मेहनती, समाजाचे प्रश्न सोडविण्याची जाण असणारे, सामाजिक बंधुता व एकोपा टिकवण्यासाठी काम करणारे आहेत, त्यामुळे पोटनिवडणुकीमध्ये मतदारांनी सतर्क राहुन धंगेकर यांना विजयी करावे, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

धंगेकर म्हणाले, मी तीस वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले. पाच वेळा नगरसेवक म्हणून नागरिकांची कामे केली. या कामांची दखल घेवून मला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.

रमेश बागवे म्हणाले, धंगेकर गेली तीस वर्षे जमिनीवर राहून समाजाची सेवा करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धंगेकर यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. आज सर्वत्र धंगेकर पाठिंबा मिळत आहे. देशात व राज्यात भाजपने वाईट परिस्थिती आणली आहे. आज लोकशाही व संविधान धोक्यात आहे, महागाई व बेरोजगारीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे भाजपला गाढण्यासाठी पोटनिवडणुकीत सर्वांनी देशातील जातीयवाद व दहशत संपवण्यासाठी धंगेकर यांना प्रचंड मतांनी विजयी करावे.

प्रशांत जगताप म्हणाले, ही पोटनिवडणुक येणार्‍या विविध निवडणुकांचे भवितव्य ठरवणार आहे. मागील अनेक वर्षे या मतदार संघात भाजपचे आमदार व खासदार आहेत, या काळात मतदार संघाला काय मिळावे, हे ठरवण्याची ही निवडणुक आहे. विधान परिषद निवडणुकीत रेशीम बागेतील भाजपचा उमेदवार पराभुत झाला. आता मोती बागेतील भाजप उमेदवाराचा पराभव करायचा आहे.
माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी सूत्रसंचालन केले.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप