देवेंद्र फडणवीस निर्दयी, नाकात नळ्या असतानाही गिरीश बापटांना प्रचारात उतरवलं: सुषमा अंधारे

पुणे, २२ फेब्रुवारी २०२३ :देवेंद्र फडणवीस आणि माणुसकीचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. त्यांना काळीच असण्याचा प्रश्नच नाही. देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांना श्वास घेण्यास त्रास होत असतानाही कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरवले, अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्या मंगळवारी रात्री पुण्यात झालेल्या प्रचारसभेत बोलत होत्या. यावेळी सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली.

चंद्रकांत पाटील यांनी मेधा कुलकर्णी यांचा कोथरूड विधानसभा मतदारसंघ हिसकावून घेतला. नंतर मेधा कुलकर्णी यांच्याकडे ढुंकूनही बघितले नाही. हीच गत मुक्ता टिळक यांच्याबाबत झाली. जेव्हा विधानपरिषदेच्या निवडणुका होत्या, तेव्हा लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढून मुंबईत मतदानासाठी नेण्यात आले. हे करताना देवेंद्र फडणवीस यांना जराही माणुसकी वाटली नाही. आता याच देवेंद्र फडणवीसांनी गिरीश बापट यांना बाहेरच्या हवेत श्वास घेताना त्रास होत असतानाही त्यांना प्रचारात उतरवले. गिरीश बापट यांच्या नाकात नळ्या होत्या, त्यांना बाहेरच्या हवेत श्वास घेण्यास त्रास होतो, हे माहीत असतानाही त्यांना प्रचारात उतरवण्याचे काम निर्दयी आणि निष्काळजी माणूसच करू शकतो. देवेंद्र फडणवीस यांना काळीज असण्याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

यावेळी सुषमा अंधारे यांनी चंद्रकांत पाटील यांचीही फिरकी घेतली. आता चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्ट फॉर्म ‘चंपा’ असा होतो, पण चंपा म्हटलं की त्यांना राग येतो. त्यामुळे आपण त्यांच्याविषयी आदराने बोलायचं, त्यासाठी आपल्याला काही पैसे पडत नाहीत, अशी टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी केली. चंद्रकांत पाटील बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागितल्याची भाषा करतात. चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरमधून कोणी काय दिलं? तुम्ही कोथरूडमध्ये आलात आणि मेधाताई कुलकर्णी यांच्याकडून त्यांचा मतदारसंघ मागून घेतला. यानंतर त्यांनी मेधाताई कुलकर्णी यांना काय भाऊबीज दिली, असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला.

कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत सुषमा अंधारे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केले. काल आमचे एकनाथ भाऊ म्हणाले की, अमित शाह आम्हाला वडिलांसारखे आहेत. एकनाथ भाऊंचं वय ५९ आहे, अमित शाह यांचं वय ५८ आहे. मी विचार करतेय की, ५८ वर्षांच्या माणसाला ५९ वर्षांचा मुलगा कसा झाला. माणसाने आपला स्वाभिमान किती गहाण ठेवावा, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.