पुणे: अमित शहा प्रचारासाठी नाही तर ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी येणार कसब्यात
पुणे, १५ फेब्रुवारी २०२३ : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची रंगत वाढत असताना याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर येणार आहेत. शहा हे भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार करणार का? अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती. मात्र शहा हे रासने यांचा प्रचार करणार नसले तरी कसबा मतदारसंघात ते येऊन ओंकारेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेणार आहेत. त्यामुळे दर्शन ओंकारेश्वराच्या असली तरी चर्चा मात्र निवडणुकीचीच राहणार आहे.
शहा यांचा पुणे दौरा निश्चित झाला असून, महाशिवरात्रीला (१८ फेब्रुवारी) ते ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवजयंतीला ते आंबेगाव येथे शिवसृष्टीचे उद्घाटन करणार असल्याचे दौऱ्यात निश्चित झाले आहे.
शहा या पुण्यातील दोन दिवसांचा
दौरा प्रशासकीय यंत्रणेला कळविण्यात
आला आहे. कसबा; तसेच चिंचवड
विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या
निमित्ताने या दौऱ्याला विशेष महत्त्व
प्राप्त झाले आहे. शहा महाशिवरात्रीला
शनिवारी नागपूर येथील जाहीर कार्यक्रमानंतर पुण्यात येणार आहेत.
हॉटेल मॅरियट येथे काश्मीरमधील
हुतात्मा पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या
५० मुलींशी ते संवाद साधणार आहेत.
त्यानंतर पंडित फार्म्स येथे पुस्तक
प्रकाशनाच्या जाहीर कार्यक्रमास
उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमानंतर शहा ओंकारेश्वर
मंदिरात दर्शन, तसेच पूजेसाठी येणार
आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी
ओंकारेश्वर मंदिरात सुमारे दीड लाख
भाविक दर्शन घेत असतात. शहा नेमके
सायंकाळी मंदिरात दर्शन व पूजेसाठी
येणार असल्याने त्यांची सुरक्षा आणि
गर्दीचे नियंत्रित करताना पोलिसांची
दमछाक होणार आहे. ओंकारेश्वर
मंदिरातील दर्शनानंतर शहा खासदार
गिरीश बापट यांची भेट घेण्यासाठी
त्यांच्या घरी जाणार आहेत. बापट
प्रकृती अस्वस्थतेमुळे घरीच आहेत.
शहा शनिवारी पुण्यात मुक्कामी आहेत.
त्यांच्या मुक्कामात ते अनेक मान्यवरांशी
संवाद साधणार असल्याचे समजते.
अमित शहा रविवारी (१९ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता आंबेगाव येथील
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी निर्माण केलेल्या शिवसृष्टीचे उद्घाटन करणार आहेत. शहा यांचा हा कार्यक्रम पूर्वनियोजित आहे. त्यानंतर शहा
कोल्हापूरला पुढील कार्यक्रमांसाठी रवाना होणार आहेत. शहा यांच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याचे समजते. गेल्या महिन्यातच हा कार्यक्रम अपेक्षित होता. मात्र, त्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला होता.