पुणे: मनसेचा भाजपला पोटनिवडणुकीत उघड पाठिंबा
पुणे, १४ फेब्रुवारी २०२३: कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत असल्याने मनसेच्या नेत्यांनी उघडपणे भाजपला पाठिंबा देऊन कार्यकर्त्यांची कोंडी केली आहे. भाजपचा प्रचार करू नका पण मतदान करा अशी आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले आहेत.
आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने कसबा पेठ आणि चिंचवड येथे पोट निवडणूक जाहीर झाली आहे. राज ठाकरे यांनी ही पोट निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पक्षांना उद्देशून पत्र लिहिलेले होते. यामध्ये त्यांनी या दोन्ही आमदारांच्या कर्तुत्वाची व पक्षनिष्ठेची जाण ठेवावी व निवडणूक बिनविरोध करा असे आवाहन केले. मात्र विरोधकांनी त्यास कडे दुर्लक्ष करून उमेदवारी अर्ज भरले आहेत.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी कसब्यातून पोट निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. या संदर्भात एक पक्षाचा मेळावा देखील झालेला होता. मात्र ऐनवेळी निवडणूक लढवायची नाही असा निर्णय जाहीर करण्यात आला. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे पूर्वी मनसे मध्ये होते. त्यांनी मनसेकडून एक पोटनिवडणूक देखील लढवलेली आहे. त्यामुळे मनसेचे अनेक कार्यकर्ते छुप्या पद्धतीने त्यांचा कसबा मतदारसंघात प्रचार करत होते.
यंदाची पोट निवडणूक ही भाजपसाठी अवघड असल्याने रासने यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे संकट ओढावन नये यासाठी भाजप नेत्यांनी मनसेला पाठिंबा जाहीर करायला लावल्याचे स्पष्ट झालेले आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मनसेला कमीत कमी आठ हजार इतके मतदान झालेले आहे. हे मतदान भाजपच्या पारड्यात पडावे यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केलेले आहेत.