कसबा पेठ मतदार संघातील मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संपन्न

पुणे, 14 फेब्रुवारी 2023: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी असलेल्या सर्व मतदान यंत्रांची निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल आणि पोलीस निवडणूक निरीक्षक अश्विनी कुमार यांच्या उपस्थितीत संगणकीय पद्धतीने मतदान केंद्रनिहाय द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात आली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राधिका हावळ-बारटक्के, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हा निवडणूक अधिकारी स्तरावर मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय सरमिसळनंतर (रँडमायझेशन) कसबा पेठ विधानसभा मतदार संघासाठी ७५६ बॅलेट युनिट, ३७८ कंट्रोल युनिट आणि ४०५ व्हीव्हीपॅट यंत्र वितरित करण्यात आले आहेत. ही यंत्रे भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) कोरेगाव पार्क येथील गोदामात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. गोदाम परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट एकूण सरासरीच्या १४० टक्के आणि व्हीव्हीपॅट यंत्र १५० टक्के उपलब्ध झाली आहेत.

सरमिसळ करण्यापूर्वी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना माहिती देऊन प्रत्यक्षिकही करून दाखविण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या शंकांचे निरसन श्री.बोरोले यांनी केले. सरमिसळ झालेल्या यंत्रांच्या माहितीची प्रत उमेदवारांना देण्यात आली, अशी माहिती श्रीमती किसवे-देवकाते यांनी दिली आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप