‘वापरा आणि फेकून द्या’ अशी नीती असणार्या भाजपला जनता धडा शिकवेल – अशोक चव्हाण
पुणे, १३ फेब्रुवारी २०२३: ‘ही पोटनिवडणूक केवळ कसब्याची नाही तर ती विचारांची निवडणूक आहे. ‘वापरा आणि फेकून द्या’ अशी नीती असणाऱ्या भाजपला कसब्याची जनता धडा शिकवेल ‘अश टीका माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज येथे केली.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार पेठ येथे आयोजित कोपरा सभेमध्ये ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ नीलम गो-हे, माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, रिपब्लिकन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राजेंद्र गवई आदींसह महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे पुणे शहर व जिल्ह्यातील माजी मंत्री रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर ,आमदार संग्राम थोपटे, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर अंकुश काकडे, माजी आमदार उल्हासदादा पवार, मोहन जोशी,शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन खरकुडे ,आबा बागुल आदी यावेळी उपस्थित होते.
श्री चव्हाण पुढे म्हणाले, घटनाबाह्य पद्धतीने सत्तेवर आलेल्या महाराष्ट्रातील हे सरकार स्थगिती सरकार असून मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीने केलेल्या सर्व विकास प्रक्रियेला थांबवण्याचे काम या मंडळींनी केले आहे. गुजरातचे महत्व वाढवत महाराष्ट्राचे सातत्याने खच्चीकरण करणारी ही मंडळी असून या सरकारला ज्या प्रकारे मुंबई महापालिकेचे विशेष लेखापरीक्षण करावेसे वाटते तसे नागपूर व पुणे महापालिकेचे का करावेसे वाटत नाही ?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाजपने उमेदवारी कोणाला द्यावी हे सांगणे आमचे काम नाही, मात्र टिळकांच्या कुटुंबाचा अपमान कसबेकर जनता कदापि खपवून घेणार नाही ‘असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तर ‘अवघे दोन आमदार वगळता पुणे शहरात भाजपच्या आमदारांची सर्वाधिक संख्या असूनही सभागृहात कोणीही पुणे शहराविषयी प्रश्न मांडले नसल्याचे आपले निरिक्षण आहे. भाजपला विकासात स्वारस्य नसून आता तर सामान्यांच्या पेन्शनवर देखील डल्ला मारण्याचं काम सुरू आहे असे डॉ नीलम गो-हे यांनी म्हटले.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, राजेंद्र गवई यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश बागवे तर रिपब्लिकन पक्षाचे अविनाश साळवे यांनी आभार मानले.