पुणे: स्थायी समितीच्या माजी अध्यक्षांची भाजपमधून काँग्रेसमध्ये घरवापसी
पुणे, ५ फेब्रुवारी २०२३: पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाली असून यात सत्ताधारी भाजपसोबतच महाविकास आघाडी देखील पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे. त्यातच कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रशिद शेख यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करुन घरवापसी केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर रशिद शेख यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे भाजपसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
रशिद शेख यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे पुणे केन्टोन्मेंटची जागा काँग्रेस पक्षाला अगदी थोडक्यात गमवावी लागली होती. आता रशीद शेख यांची पुन्हा एकदा घरवापसी झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा काँग्रेसची ताकद पुण्यात वाढणार असे बोलले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत रशिद शेख यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, आदी काँग्रेस नेते उपस्थित होते.
दरम्यान, रशिद शेख यांचे बंधू रफिक शेख हे काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. त्यांच्या लोहियानगर-कासेवाडी प्रभागातील जवळपास २० हजारांहून अधिक मतदार कसबा विधानसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे रशिद शेख यांच्या काँग्रेस प्रवेशाचा फटका भाजपला बसू शकतो, असे बोलले जात आहे. यावेळी बोलताना रशिद शेख यांनी काँग्रेस उमेदवाराला निवडूण आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
पुणे दौऱ्यावर असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्ष कसबा निवडणुक लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले.
तसेच उमेदवार देखील आज संध्याकाळपर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.
उमेदवाराचे नाव जाहीर केल्यानंतर त्याचा उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल करण्यात येईल.
असेही यावेळी जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप