पुणे: काँग्रेसकडून तीन इच्छुकांच्या नावांची दिल्लीकडे शिफारस
पुणे, ३ फेब्रुवारी २०२३: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरविण्यासाठी काँग्रेसच्या निवड समितीची मुंबईत आज बैठक झाली. त्यामध्ये १६ इच्छुकांपैकी तीन अंतिम करून दिल्लीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे पाठवली जाणार आहेत. त्यपैकी एका नावाची घोषणा दोन ते तीन दिवसात होणार आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी बैठक घेऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची भावना जाणून घेतली. पाचवेळी सपाटून मार खाणाऱ्या काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीनेच कसब्यातून निवडणूक लढवावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. यावर पवार यांनी आघाडीत चर्चा करू असे सांगितले.
आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने २६ फेब्रुवारी रोजी कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. भाजपने पाच उमेदवारांची अंतिम यादी केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवली असली तरीही अजून उमेदवार जाहीर केलेला नाही. या यादीत नाव नसणाऱ्या पुण्यातील एका नेत्याने मुंबई जाऊन पक्षाच्या नेत्यांकडे उमेदवारी मिळविण्यासाठी खटाटोप केला. पण त्यास काही यश आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शैलेश टिळक यांनी निवडणूक कार्यालयातून आज उमेदवारी अर्ज घेतला आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेसकडे कसबा मतदारसंघ असला तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे. यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी मुंबईत आघाडीची बैठक होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे निरीक्षक व आमदार संग्राम थोपटे यांनी आज प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत इच्छुकांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांनी चर्चा करून तीन नावे अंतिम केली आहेत. ही तीन नावे दिल्लीला पाठवली जाणार असून, तेथे तीनपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होईल. काँग्रेसच्या एका गटाकडून मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र धंगेकर, कमल व्यवहारे, बाळासाहेब दाभेकर या तिघांची नावे अंतिम यादीत आहेत. तर तर दुसऱ्या गटाने अरविंद शिंदे, व्यवहारे आणि धंगेकर यांचा तीनमध्ये समावेश आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. शनिवारी (ता. ४) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पुणे दौऱ्यावर असून, याच दिवशी काँग्रेसचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.