कसबा विधानसभेत भाजपची खेळी; कुणाल टिळकांची प्रवक्‍तेपदी नियुक्‍ती

पुणे, ३ फेब्रुवारी २०२३: कसबा विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण? याबाबत तर्कवितर्कांना उधान आलेले असताना प्रदेश भाजपकडून या निवडणुकीत नवा “ट्विस्ट’ आणण्यात आला. पक्षाकडून स्वर्गीय मुक्‍ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल यांची भाजपच्या प्रदेश प्रवक्‍ते पदी नियुक्‍ती केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रवक्‍त्यांची विस्तारीत यादी जाहीर केली असून त्यात कुणाल यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपकडून टिळक यांच्या कुटूंबात उमेदवारी दिली जाण्याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, कुणाल टिळक यांच्यासह पुण्यातून आमदार सिध्दार्थ शिरोळे, संदीप खर्डेकर, विनायक आंबेकर आणि अली दारूवाला हे पाच जण प्रवक्‍ते असणार आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघातील आमदार मुक्‍ता टिळक यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून मुक्‍ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, कुणाल टिळक, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने तसेच धीरज घाटे इच्छूक आहेत. तर या पाच जणांची नावे प्रदेश कार्यकारिणीकडून दिल्लीत कळविण्यात आल्याची चर्चा आहे, त्यातच पुढील दोन दिवसांत भाजपचा उमेदवार जाहीर होणार असतानाच कुणाल यांची प्रवक्‍तेपदी वर्णी लावल्याने भाजप कडून टिळक यांच्या कुटूंबातील सदस्यांना उमेदवारी दिली जाणार की नाही याबाबत शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. दरम्यान, निवडणूक अर्ज भरणासाठी पुढील काही दिवसच शिल्लक असल्याने त्यातच कुणाल यांची प्रदेशप्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याने भाजपमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचेही या निमित्ताने समोर आले आहे.