अजित पवारांनी उपटले पुणे पोलिसांचे कान
पुणे, २ फेब्रुवारी २०२३ : “एखादा गुन्हेगार सापडत नसेल तरच बक्षीस जाहीर केले जाते, त्यामुळे नवीन पायंडे पाडू नका. यामुळे पोलीस यंत्रणे पुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. ही योजना ज्याने जाहीर केली त्या पोलिस अधिकार्याकडे विचारणा करणार आहे, अशा शब्दात पुणे पोलिसांच्या त्या निर्णयावर अजित पवारांची टीका करत अधिकार्यांचे कान उपटले.
गुन्हेगाराला पकडणाऱ्या पोलिसांना बक्षीस देण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला होता. फरार असणाऱ्या, पाहिजे असणाऱ्या, शस्त्र बाळगणाऱ्या आणि सराईत गुंडांना पकडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पाच ते दहा हजार रुपये बक्षीस देण्याचे पुणे पोलिसांनी जाहीर केले होते. या निर्णयावर अजित पवारांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, एखादा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती अजिबातच सापडत नसेल तेव्हा त्याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केलं जातं. मात्र सरसकट बक्षीस जाहीर होत असेल तर पोलीस यंत्रणे पुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. कायदा सुव्यवस्था राखणे आणि महिलांवर अत्याचार न होऊ देणे हे पोलिस यंत्रणेचे काम आहे. मात्र या कामासाठी त्यांना आमिष दाखवलं जात असेल तर हे योग्य नाही.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून, खबऱ्याच्या माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. नवीन पांडे पाडण्याची गरज नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी बक्षीस देण्याचा निर्णय का घेतला त्याची मी त्यांना विचारणा करणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.