अहमदनगर काँग्रेसची कार्यकारणी बरखास्त – नाना पटोले यांनी काढले आदेश

अहमदनगर, २६ जानेवारी २०२३: नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अहमदनगर जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारणीच बरखास्त करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना मोठा झटका बसला असल्याची चर्चा नगर जिल्ह्यात सुरू झाली आहे.

नाशिक पदवीधर विधानपरिषद पोटनिवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी भरली. त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेसवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि तांबे परिवाराची चांगली पकड आहे. त्यामुळे तांबे यांनाच सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळत असल्याचे निदर्शनास आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी तांबे यांच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना बुधवारी पक्षातून निलंबित करण्यात आले. त्यानंतर आज गुरुवारी काँग्रेसची संपूर्ण कार्यकारिणीस बरखास्त करून टाकण्यात आली. महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिलेला असला तरी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत दिसून येत नाहीत. तर ते तांबे यांच्यासोबतच फिरत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर नाना पटेल यांनी संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे.

साळुंखे म्हणाले, काँग्रेसने निलंबित करण्याअगोदर, मी पदाचा राजीमाना दिला आहे. सुधीर तांबे, सत्यजित तांबेंना पक्षाने निलंबित केले आहे. मी त्यांना उघड पाठिंबा दिला आहे. जिल्हा काँग्रेस सत्यजित यांच्या पाठीशी आहे. तांबेंना उमेदवारी न देऊन पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला आहे. त्यांच्यावर शंभर टक्के अन्याय केला आहे. त्याच्या निषेध म्हणून मी राजीनामा दिला आहे.

बाळासाहेब थोरातांना तांबेंना पाठिंबा द्या अस सांगितले नाही. ते आजारी असल्याने बोलणे झालेले नाही. मी वैयक्तिक पातळीवर, कार्यकर्त्यांशी चर्चा करून राजीमाना दिला आहे. सत्यजित तांबे भाजपबरोबर गेले तर आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही.