चिंचवडच्या जागेवर शिवसेनेचा डोळा ; संजय राऊतांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीसोबत ठिणगी?

मुंबई, २५ जानेवारी २०२३ : पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या मतदारसंघात उमेदवार देण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात पिंपरी चिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी आणि कसबा मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादीने लढवावा, अशी आमची भूमिका असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असतानाही राव त्यांनी अचानक ही मागणी केल्याने गोंधळ उडाला आहे

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “अंधेरीची निवडणूक भाजपकडे उमेदवार नव्हता म्हणून बिनविरोध झाली. नांदेड आणि पंढरपूर येथे देखील पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या नाहीत. दोन्ही ठिकाणी मृत आमदाराचे नातेवाईक उभे असतानाही भाजपाकडून उमेदवार देण्यात आले. पंढरपूर-नांदेडच्या निवडणुकीत संस्कृती दिसली नाही. अंधेरीच्या निवडणुकीत दिसली त्याला वेगळी कारणे आहेत.”

संजय राऊत यांनी मविआच्या बैठकीनंतर शिवसेनेची भूमिका व्यक्त केली असली तर अद्याप मविआची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही जागांसाठी इच्छूक आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे चांगले प्राबल्य आहे. महानगरपालिकेवर सातत्याने राष्ट्रवादीची सत्ता राहिली होती. लक्ष्मण जगताप देखील अनेक वर्ष राष्ट्रवादी सोबत होते. तर दुसरीकडे पुण्यात देखील राष्ट्रवादीचे संघटन मजबूत आहे. पुणे मनपामध्ये राष्ट्रवादीचे चांगले प्रतिनिधित्व आहे. तसेच पुण्यात काँग्रेसची देखील चांगली ताकद आहे. त्यामुळे या दोन जागा कोणत्या पक्षांना मिळणार याचा निर्णय अद्याप होणे बाकी आहे.

पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात काल (दि. २४ जानेवारी) मविआ नेत्यांची चर्चा झालेली आहे. आज परत एकदा त्यावर चर्चा केली जाईल. पिंपरी चिंचवडची जागा शिवसेनेनी द्यावी, तसेच पुण्यातील कसबा मतदारसंघाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी निर्णय घ्यावा, अशी भूमिका संजय राऊत यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली. आम्ही निवडणुकीपासून लांब राहिलो तरी काही अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे मविआने या पोटनिवडणुका लढविण्याचा विचार केला असल्याचेही संजय राऊत म्हणाले.