नेत्यांची खलबते सुरू ; ‘कसबा’, ‘चिंचवड’मध्ये लढतीची चिन्हे
मुंबई, २५ जानेवारी २०२३ : विधानसभेच्या रिक्त झालेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू असले तरी महाविकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. भाजपने अंधेरी (पूर्व) पोटनिवडणूक वगळता विधानसभेसाठीच्या इतर तिन्ही जागांसाठी उमेदवारी दाखल करत निवडणूक लढविली होती, त्यामुळे कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक लढवावी, असा सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये आहे. याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेत मते आजमवली.
भाजपने अंधेरी पूर्वमध्ये उमेदवारी मागे घेत उद्धव ठाकरे यांच्या गटाविरोधात निवडणूक लढविली नाही. मात्र, पंढरपूर, कोल्हापूर आणि देगलूर विधानसभा पोटनिवडणूक भाजपने ताकदीने लढविली होती. मृत्यू पावलेल्या आमदाराबाबत सहानुभूती म्हणून पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची संस्कृती पाळावी असे संकेत आहेत. मात्र, तरीही भाजपने या तिन्ही ठिकाणी लढत दिल्याने कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत उमेदवार द्यावेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. याबाबतचा निर्णय एकट्याने घेण्याऐवजी शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत एकत्र बसून घ्यावा, यावर ‘राष्ट्रवादी’च्या बैठकीत एकमत झाले.
त्यानुसार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री वर जाऊन भेट घेतली. काँग्रेस नेत्यांसोबतही चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. मित्र टिकून राहावेत, हीच इच्छा शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये झालेल्या युतीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “युतीला आमचा विरोध नाही. कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये, याची काळजी आघाडीतील प्रमुख घटकांनी घ्यावी, अशी इच्छा आहे,” असे मत जयंत पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांनी कुणाशीही चर्चा केली आणि नवे मित्र जोडले तरी कुणाचा विरोध नाही; परंतु मित्र जोडताना ते मित्र शेवटपर्यंत राहतील आणि निवडणूक आपल्याबरोबर लढवतील याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे पाटील म्हणाले.
कार्यकर्त्यांना विश्वासात घेणार कसबा व पिंपरी चिंचवडबाबत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र बसतील व त्यावर निर्णय होईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. “चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असल्याने कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन चर्चा केली जाईल. भाजप सध्या चिंचवडमध्ये विरोधकांवर दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र खरी चौकशी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराची करायला हवी. त्याठिकाणी चौकशी केली तर भाजपचा किती भ्रष्टाचार आहे हे स्पष्ट होईल,” असेही पाटील म्हणाले.