पुणे: कसब्याची पोटनिवडणूक बापटांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक जिंकण्याचा भाजपा पदाधिकाऱ्यांचा निर्धार

पुणे, २३ जानेवारी २०२३ : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे होणारी कसबा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न आहे. पण निवडणूक झालीच तर ती जिंकण्याचा निर्धार आज पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्यात येणार आहे.

कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार कोण असणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांच्यासह हेमंत असणे गणेश बिडकर धीरज घाटे या दोघांच्या नावाची चर्चा सुरू आहे याबाबत अजून त्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही मात्र या निवडणुकी संदर्भात आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड निवासस्थानी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, शैलेश टिळक, कुणाल टिळक, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आमदार भीमराव तापकीर, माजी मंत्री दिलीप कांबळे, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, माजी शहराध्यक्ष योगेश गोगावले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कसबा भाजपाचा परंपरागत मतदारसंघ आहे. येथील सर्व मतदार नेहमीच भाजपावर मनापासून प्रेम करतात. मुक्ताताई टिळक यांच्या निधनामुळ ही पोटनिवडणूक लागली आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराचं नाव पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डकडून येईलच. पण आम्ही पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केलीही आहे. मताधिक्य वाढण्यावर आमचा भर असेल.

मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वांचीच भावना आहे. मात्र, गाफिल न राहता विजयासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते कामाला लागलो आहोत. पोटनिवडणुकीतील विजयच मुक्ता टिळक श्रद्धांजली ठरेल, पाटील यांनी सांगितले.