पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाच्या नवीन व विस्तारित मराठी आवृत्तीचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, 19 जानेवारी 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताला जगातील पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या दृष्टीने आपल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकातून त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला निर्भय होण्याचा तसेच आत्मविश्वासाने जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला आहे, असे सांगताना ‘एक्झाम वॉरियर्स’ हे मराठी अनुवादित पुस्तक राज्यातील सर्व शाळांच्या ग्रंथालयांमध्ये पोहोचविण्यात यावे अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केली. पंतप्रधान मोदी यांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाच्या नवीन व विस्तारित मराठी आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना भ्रमण करून देश समजून घेण्याचा संदेश दिल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांनी शिवनेरी, रायगड, सिंहगड हे शिवकालीन ऐतिहासिक गडकिल्ले तसेच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ सारखे आधुनिक स्मारक पाहून त्यातून प्रेरणा घ्यावी, असे राज्यपालांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अति वापर टाळावा तसेच आपल्या अंगभूत क्षमता ओळखाव्या असा सल्ला राज्यपालांनी यावेळी दिला. ‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक केवळ परीक्षांना सकारात्मकतेने तोंड देण्याचा मार्ग दाखविण्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण जीवनाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी योद्ध्याप्रमाणे जगावे असा संदेश देणारे असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा शासन प्रयत्न करेल असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणाला महत्व दिले आहे. रशिया, फ्रांस, जर्मनी ही राष्ट्रे आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देत असल्याचे नमूद करून इंग्रजीचे शिक्षण न थांबवता विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून शिक्षण घ्यावे असे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. या वर्षीपासून अभियांत्रिकी तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांची पुस्तके मराठी भाषेतून उपलब्ध केली जातील असे त्यांनी सांगितले. ‘एक्झाम वॅरियर्स’ या पुस्तकातून मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी योग – ध्यानाचा मार्ग दाखविला असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुस्तक विद्यार्थी, पालक व शिक्षकांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक सिद्ध होईल असे केसरकर यांनी सांगितले.

आपल्या भाषणात शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी राज्यातील शंभर टक्के मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुरुप शिकविण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध शाळांमधील पाच विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात ‘एक्झाम वॅरियर्स’ या मराठी पुस्तकाची प्रत भेट देण्यात आली. कार्यक्रमाला मुंबई व परिसरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, तसेच कॅम्पियन , सेंट मेरी, बालमोहन विद्यामंदिर, अंजुमन इस्लाम मुलींची शाळा व गार्डियन स्कुल डोंबिवलीचे विद्यार्थी उपस्थित होते. नॅशनल बुक ट्रस्ट तर्फे या मराठी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले आहे.