सत्यजित तांबे कॉंग्रेसमधून निलंबित, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घोषणा

मुंबई, १९ जानेवारी २०२३ : सत्यजित तांबे यांचं काँग्रेसमधून निलंबन केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. सत्यजित तांबे यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन नाशिक पदवीधर मतदार संघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. एकामागून एक असे नवीन ट्वीस्ट समोर येताहेत.

सत्यजित तांबे यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसनं डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.

पक्षानं अधिकृत उमेदवारी जाहीर करून व एबी फॉर्म देऊनही सुधीर तांबे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली व मुलाच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा दिला. तांबे यांच्या या भूमिकेमुळं काँग्रेस पक्षात संताप असल्याचं दिसून येतंय. डॉ. सुधीर तांबे यांनाही कॉंग्रेसमधून निलंबीत करण्यात आलं. त्यानंतर आता सत्यजित तांबे यांच्यावरही पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे.

अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी थेट मातोश्री गाठत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेत पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्यावर ठाकरे गटाने होकार दर्शवत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपली भूमिका जाहीर केलेली नव्हती. यानंतर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट करत शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील, असे त्यांनी सांगितलंय.