सत्यजित तांबेंच्या विरोधात भाजपमध्ये बंडखोरी शुभांगी पाटील महाविकासआघाडीची उमेदवारी ?

नाशिक, १४ जानेवारी २०२३: सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपने त्यांना झुकते माप देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता भाजप तर्फे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या शुभांगी पाटील यांनी बंडखोरीचा पवित्र घेतला आहे. त्या आता महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून रिंगणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा करणाऱ्या तांबे कुटुंबीय आणि भाजपला झटका बसणार आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही अपक्षांची निवडणूक असल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, असा प्रतिदावा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. त्यानंतर आज भाजपाच्या नेत्या शुभांगी पाटील या मातोश्रीवर दाखल झाल्या आहेत. शुभांगी पाटील यांनी देखील नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरलेला आहे. त्यांना भाजपाचा अधिकृत पाठिंबा मिळेल, अशी शक्यता होती. मात्र भाजपा काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांच्याबाजूला झुकत असल्याचे दिसत शुभांगी पाटील यांनी मातोश्री गाठून ठाकरे गटाचा पाठिंबा मिळतो का? याची चाचपणी सुरु केली आहे.

शुभांगी पाटील यांनी एक व्हिडिओ प्रसारीत करुन त्यांची भूमिका मांडली आहे. महाविकास आघाडीने आपला उमेदवार निश्चित केला होता. तसेच भाजपाकडून मलाच अधिकृत उमेदवारी मिळेल, असे सांगण्यात आले. मात्र दुपारी अडीच वाजता काँग्रेसच्या नेत्याने स्वतःचा अर्ज न भरता स्वतःच्या मुलाचा अपक्ष अर्ज भरला. एवढी नाट्यमय घडामोड कधीही नाशिक पदवीधर निवडणुकीत घडली नव्हती. सामान्य घरातल्या मुलीने राजकारणात पुढे येऊच नये, असे काहींना वाटते. राजाचा मुलगा राजा नाही बनणार. पण माझ्यासाठी माझे पदवीधर बांधव, डॉक्टर, शिक्षक यांनी घरोघरी जाऊन अर्ज भरले आहेत. त्यामुळे मी ही निवडणूक लढविणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्य टीचर्स असोसिएशनच्या अध्यक्षा शुभांगी पाटील यांनी २२ सप्टेंबर २०२२ रोजी भाजपामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस शिक्षक संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष शुभांगी पाटील यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.

नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांच्या आणि ५४ तालुक्यांच्या मतदारसंघासाठी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी माघार घेऊन मुलगा सत्यजित तांबे याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी (ता. १२) अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या.