९० हजार एसटी कर्मचाऱ्यांची पगार अडकावला; पडळकर, सदावर्ते कुठे गेले -महेश तपासेंची टीका

मुंबई, १३ जानेवारी २०२३: जानेवारी महिना उजाडला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही. आता गुणरत्न सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांचा कळवळा आला नाही का? आता कुठे आहेत हे दोघे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
राज्यातील ९० हजार एसटी कर्मचाऱ्यांचा पगार अद्याप झालेला नाही. महाविकास आघाडी सरकार असताना या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरमहिन्याला ३६० कोटी रुपयांची तरतूद राज्यसरकारच्या कोषातून केली जात होती. आता सहा महिन्यापासून शिंदे – फडणवीस सरकार आले आहे तरीदेखील कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत नाही हे दुर्दैव आहे असेही महेश तपासे म्हणाले.

भाजपप्रणीत सरकार आले तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागे तेच पगाराचे ओझे आहे त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचे मसिहा बनण्याचा प्रयत्न करणारे सदावर्ते आणि पडळकर काय भूमिका घेणार हे आता त्यांनी जनतेसमोर जाहीर करावे असे आवाहन महेश तपासे यांनी केले आहे.