‘पुण्याचे नाव जिजाऊ नगर करा,’ अमोल मिटकरींची मागणी, पण हिंदू महासंघाचा विरोध!

पुणे, १३ जानेवारी २०२३ : अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा गाजत असताना आता पुण्याचे नाव बादलण्याची मागणी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करावे, अशी मागणी केली आहे. तर या नावास हिंदू महासंघाने विरोध केला आहे. त्यामुळे पुणे शहर नामांतराच्या मुद्द्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी पुणे शहराला जिजाऊ नगर असे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यांनी याबाबत एक ट्वीटही केले आहे. “पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार,” असे अमोल मिटकरी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार, असे ट्विट आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. तर पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करण्यास हिंदू महासंघाने विरोध केले आहे. “जिजाऊमाता देशातील सर्व हिंदुत्ववाद्यांना आणि शिवभक्तांना वंदणीय आहेत. मात्र पुणे शहराला त्यांचे नाव देणे उचित होणार नाही, असे आमचे मत आहे. स्वत: छत्रपती शिवाजी महाराज यांनीदेखील या शहराचे नाव बदलले नव्हते. त्याऐवजी राजमाता जिजाऊ यांचे लाल महाल येथे स्मारक उभारण्यात यावे. हिंदू महासंघाची ही जुनीच मागणी आहे,” अशी भूमिका हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी घेतली आहे.