धुरंधर समजणाऱ्यांना देवेंद्रजी पुरुन उरले – चंद्रकांत पाटील
पुणे, ११ जानेवारी २०२३ ः ‘‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रातील एका नेत्याला खूप भीती वाटत असल्याने त्यांचा देशभरातील प्रवास बंद झाला. माझ्या इतका कोणी धुरंधर नाही, असे वाटणाऱ्यांना पुरून उरणारे फडणवीसांसारखे नेतृत्व तयार झाले. त्यांना कोणीही मॅनेज करू शकत नाही, त्यांच्यामुळे राज्यात भाजपची हुकूमत निर्माण झाली,’’ अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांचे कौतुक केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देशभरात गाजलेल्या भाषणांचे तयार करण्यात आलेल्या ‘धडाकेबाज लोकनेते- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’ पुस्तकाचे प्रकाशन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पाटील यांच्या हस्ते झाले.
शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार भीमराव तापकीर, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, माजी आमदार बापू पठारे, योगेश टिळेकर आदी यावेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘देवेंद्रजींच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू मांडायला बराच वेळ लागेल, पण एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी बोलल्यानंतर त्यांना कधीही विधान मागे घ्यावे लागले नाही. त्यांच्या बोलण्यातून श्लेष काढण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही. त्यांच्या भाषणांप्रमाणे आपणही अभ्यास करून बोललो पाहिजे हे शिकले पाहिजे. वृत्तपत्रांना वाद निर्माण करायचे ठरवले आहे. पण आपण मी काही गडबड केली नाही असे मानून निश्चित राहिले पाहिजे. देवेंद्रजींच्या मनात काय सुरू आहे हे चेहऱ्यावरून कळत नाही. सचिन वाझे, नवाब मलिक यांचा अभ्यास करून सर्व काही शोधून जेलमध्ये पाठवले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘‘मी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा गेल्या ३२ वर्षांपासूनचे सहकारी आहोत. फडणवीस यांची भाषणे आपल्यासाठी उपयुक्त आहेत. राज्यातील १८ पगड जाती, बलुतेदार यासह सर्व समाजाला न्याय देणे हा त्यांचा संकल्प आहे. जातीपातीतून बाहेर पडलेले हे नेतृत्व आहे. विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी यांच्या मनात जी मोजकी नावे आहेत, त्यापैकी एक देवेंद्रजी आहेत. गावापासून देशापर्यंत, समाजाचा, महापुरुषांचा त्यांचा अभ्यास आहे. प्रवास आणि संवाद यातून हे प्रगल्भ नेतृत्व तयार झाले आहे. देवेंद्रजी आशीर्वादाने नाही तर कर्तृत्वाने नेते तयार झाले आहेत.
बावनकुळेंनी सांगितले उमेदवारीचे चार निकष
धन्यवाद मोदीजी, फ्रेंड्स आॅफ बीजेपी असे उपक्रम सुरू आहे. ज्याला नगरसेवक पदाचे तिकीट पाहिजे असेल त्यांनी उमेदवार मागायला येताना ५०० घरी धन्यवाद मोदीजी, ५०० घरात फ्रेंड्स आॅफ बीजेपी, २५० युवा वॉरियर्सची नोंदणी हे उपक्रम राबविले की नाही. ५०० नवीन मतदार नोंदविले की नाही हे दाखवावे. या चार निकषांवर उमेदवारी दिली जाईल. तसेच पुण्यात शहराध्यक्षांकडून एका प्रभागातून चार जागांसाठी बारा नावे मागवून घेणार असून, त्यातील जनतेला ए प्लस मिळणार त्याला थेट एबी फॉर्म पाठवून देण्याचा निर्णय घेतला आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.