विद्यांजली योजनेंतर्गत भारतीय लष्कराचे दक्षिण कमांड दक्षिण भारतातील 75 शाळांबरोबर, 06 जानेवारी 2023 रोजी एका व्यापक कार्यक्रमाचा शुभारंभ करणार
पुणे, ०५/०१/२०२३: सामुहिक आणि खासगी क्षेत्राच्या सहभागाद्वारे शाळांना बळकटी देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 07 सप्टेंबर 2021 रोजी सुरू केलेल्या विद्यांजली योजनेच्या अनुषंगाने, भारतीय लष्कराचे दक्षिण कमांड दक्षिण भारतातील निवडक शाळांबरोबर एका व्यापक कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहे. हा उपक्रम 15 जानेवारी 2023 रोजी बंगळूरू येथे आयोजित करण्यात येणाऱ्या 75 व्या आर्मी डे परेडसाठी नियोजित कार्यक्रमांच्या मालिकेतील चौथा कार्यक्रम आहे.
भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ साजऱ्या होत असलेल्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा भाग म्हणून या उपक्रमासाठी 75 शाळांची निवड करण्यात आली असून, या ठिकाणी 06 जानेवारी 2023 रोजी स्वयंसेवी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
30 आर्मी पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आणि प्राध्यापक नामांकित करण्यात आलेल्या शाळांमध्ये पोहोचतील, आणि पुस्तकांची तरतूद, अभ्यास साहित्य, वाचन साहित्य, लष्करी डॉक्टरांद्वारे वैद्यकीय शिबिरे, योग वर्गांचे आयोजन, शारीरिक शिक्षण वर्ग, क्रीडा स्पर्धा इत्यादींसह विविध उपक्रम राबवतील.
15 जानेवारी 2023 रोजी बंगळूरू येथे, दक्षिण भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या आर्मी डे परेडबाबत जागरुकतेची पातळी वाढविण्यासाठी देखील या उपक्रमाचा उपयोग केला जाईल. 06 जानेवारी 2023 रोजी सुरू होणारा हा आउटरीच कार्यक्रम वर्षभर सुरू राहील. हा कार्यक्रम यासाठी निवडण्यात आलेल्या शाळांच्या शैक्षणिक, पायाभूत सुविधा आणि इतर सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी उपयोगी ठरेल, आणि राष्ट्र उभारणीसाठी असलेली भारतीय लष्कराची वचनबद्धता प्रदर्शित करेल.