पुण्याला कडक आणि सक्षम पोलीस अधिकारी द्या

पुणे, ५ जानेवारी २०२३ : शहरामध्ये हातात कोयते घेऊन फिरणाऱ्या गॅंगमुळे प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर नवे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार स्वीकारला पण त्यानंतरही कोयते यांची दहशत सुरूच आहे. आता त्यावर भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करून पुण्याला एका सक्षम पोलीस अधिकाऱ्याची गरज आहे अशी मागणी केली आहे.

भाजपचे प्रसिद्धीप्रमुख पुष्कळ तुळजापूरकर यांनी या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन पाठवले आहे.

सध्या पुण्यात गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढत आहे ह्याचा परिपाक म्हणून की काय सध्या मिसरूड न फुललेली अर्धवट वयातील मुले सध्या गुन्हेगारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वळल्याचे दिसत आहे सध्या पुण्यात कोयता गॅंग ने तर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे पुणे पोलीस जरी कडक कारवाई करत असले तरी ते पुरेसे ठरत नाही त्याचे कारण वाढते शहर म्हटलं की वाढती गुन्हेगारी ही आलीच परंतु पुण्याला आता कडक व सक्षम अधिकाऱयांची गरज आहे ह्याचा अर्थ आता जे अधिकारी आहेत ते अजिबात असक्षम आहेत असे नाहीत परंतु ह्या घटनांना चाप लावणे गर्जचेच झालं आहे असे मला वैयक्तिक वाटते पूर्वी एक पोलीस चौकात असेल तर कुणाची हिम्मत होत नव्हती कुठल्या प्रकारचा दंगा करण्याची परंतु आता असे दिसत नाही आता तर पोलिसांना मार द्यायला पण हे गुन्हेगार मागे पुढे बघत नाहीत सध्या संघटित गुन्हेगारी जरी कमी असली तरी ह्या असल्या गँग फोफावत आहेत तरी आपल्याला विनंती आहे की ह्या विषयात आपण व माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी गंभीरपणे लक्ष घालून ह्या गुन्हेगारांना धडा शिकवून हे कायद्याचे राज्य असल्याचे दाखवून द्यावे ही विनंती, अशी मागणी तुळजापूरकर यांनी केली आहे.