लोहगड किल्ल्यावर जमावबंदी उरुसाला बंदी
पुणे, ५ जानेवारी २०२३ : प्रतागडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजखानाच्या कबरीशेजारीलअतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच हटवले. त्यानंतर आता लोहगड किल्ल्यावर होणाऱ्या उरुसाला परवानगी नाकारण्यात आली आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर आता लोहगडावर उरुस साजरा करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.
त्यामुळे यंदा लोहगडावर उरुस साजरा होणार नाही. पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ला हा ऐतिहासिक महत्त्व असलेले स्थळ आहे. हा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून देखील घोषित करण्यात आलेला आहे. दरवर्षी लोहगड किल्ल्यावरील हाजी हजरत उमरशा वाली बाबा यांचा उरूस भरतो. मात्र यावर्षी उरुसाला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे लोहगड किल्ला परिसरात कलम 144 नुसार जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
मावळ तालुक्यातील अनेक संघटनांनी लोहगड किल्ल्यावरील उरूस साजरा होऊ नये यासाठी उपविभागीय दंडाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांना निवेदन दिले होते. लोहगडावरील दर्गा व मजारी यांना कोणताही ऐतिहासिक पुरावा नसल्याने ही अनधिकृत बांधकामे काढावीत. तसेच हे अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी उरुसाचा वापर केला जात असल्याचे या निवेदनात म्हटले होते. त्यामुळे लोहगडावर उरुस होऊ देऊ नये. जस तसे झाल्यास मोठे आंदोलन उभारु असा इशारा बजरंग दल आणि इतर संघटनांनी दिला होता.
मात्र आता प्रशासनानेच उरुस साजरा करण्यास परवानगी नाकारली आहे. भारतीय पुरातत्व विभागाने ही लोहगडावर उरुसाला परवानगी नाकारली असल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे लोहगड किल्ला परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी 5 जानेवारी ते 8 जानेवारी या कालावधीत लोहगड आणि घेरेवाडी परिसरात कलम 144 आदेश लागू करण्यात आले आहेत.