फिल्म सिटी बाबत योगी आदित्यनाथ यांचे मुंबईत महत्त्वाचे वक्तव्य – ” उत्तर प्रदेशात फिल्मसिटी करणार..”
मुंबई, ५ जानेवारी २०२३: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारून मुंबईमधील चित्रपट उद्योग नष्ट करण्याचा घाट योगी आदित्यनाथ यांच्याकडून घातला जात आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून केला जातो. आदित्यनाथ यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने हाच प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे. दरम्यान, माध्यम प्रतिनिधींशी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी यावर सविस्तर भाष्य केले आहे.
“मुंबई ही मुंबई आहे. हे शहर अर्थभूमी आहे. तर उत्तर प्रदेश राज्य हे धर्मभूमी आहे. या दोघांचा सुंदर संगम होऊ शकतो. मुंबईतील फिल्मसिटी घेऊन जाण्याचा आमचा कोणताही विचार नाही. मात्र आम्ही आमची स्वत:ची फिल्मसिटी उभारत आहोत,” असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या आरोपींच्या घरावर किंवा बांधकामावर उत्तर प्रदेशमध्ये थेट बुलडोझर चालवला जातो. उत्तर प्रदेश सरकार तसेच प्रशासनाकडून केली जाणारी ही कारवाई नेहमीच चर्चेत असते. काही लोकांकडून या कारवाईचे स्वागत केले जाते. तर काही लोक अशा कारवाईचा निषेध करताना दिसतात. या कारवायांमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बुलडोझर बाबा म्हटले जात आहे. यावरही योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले आहे.
“पायाभूत सुविधा आणि विकासासाठी बुलडझोरची भूमिका महत्त्वाची आहे. बुलडोझर शांतता आणि विकासाचे प्रतिक ठरू शकते. मात्र लोकांकडून कायद्याचे उल्लंघन होत असल्यास कायद्याचे राज्य पुन:प्रस्थापित करण्यासाठी याच बुलडोझरचा उपयोग केला जाऊ शकतो,” अशी टिप्पणी योगी आदित्यनाथ यांनी केली.
योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मालमत्ता बुलडोझरच्या मदतीने उद्ध्वस्त केल्या होत्या. याच कारणामुळे त्यांच्या या कारवाईची चांगलीच चर्चा झाली होती. विरोधकांकडून योगी आदित्यनाथ यांना बुलडोझर बाबा म्हणत टीका करण्यात आली. तर काही जणांनी याच शब्दाचा वापर करता त्यांच्या या कारवायांची स्तुती केली.