पुणे: मुक्ता टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या रूपाली पाटलांचा कसब्यावर डोळा, राष्ट्रवादीत नाराजी

पुणे, २७ डिसेंबर २०२२: भाजपच्या कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतेच निधन झाले आहे. मात्र, टिळक यांच्या निधनाला एक आठवडाही झालेला नसताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांचा कसबा मतदारसंघावर डोळा ठेवून आहेत. पक्षाच्या नेत्यांना न विचारता पाटील यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली त्यामुळे रुपाली पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीतच नाराजीचे सूर उमटत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना कसबा मतदारसंघाच्या आमदारकी लढविण्याविषयी आपली भूमिका मांडली होती. यावेळी पाटील म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदेश दिला तर मी कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. मुक्ता टिळक यांच्यानंतर त्यांच्या घरात राजकारणात येण्यासाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी कोणी नाही. त्यांचे पती राजकारणात सक्रिय नाही. मुलगा सुद्धा लहान असून त्याचे नुकतेच लग्न झाले आहे.

मनसेने २०१९ मध्ये मुक्ता टिळक आजारी आहेत म्हणून माझं तिकीट कापलं होतं. त्यावेळी आम्ही समजूतदारपणा दाखवला होता. पण त्यानंतर कुठलीही विकासाची कामे झालेली नाहीत. तसेच पोटनिवडणुकीत जनतेचा कौल मी स्वीकारेल असेही मत रुपाली पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहेत.

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाने संधी दिल्यास लढणार अशी घोषणा रूपाली पाटलांनी करताच राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. वरिष्ठांना न विचारताच पाटील यांनी भूमिका मांडल्यामुळे शहरातील पदाधिकारी नाराज झाले आहेत. याबाबत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे. पाटील यांच्या घोषणेमुळे जनमानसात चुकीचा संदेश जात असल्याचे राष्ट्रवादी पदाधिकारी यांचे मत आहे. मुळात राज्यात महाविकास आघाडी आहे. आणि कसबा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे असूनही रूपाली पाटलांनी दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.