सरकार पडलं पाहिजे म्हणून अनेकजण देव पाण्यात घालून बसलेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य
नागपूर, २६ डिसेंबर २०२२: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (२३ नोव्हेंबर) शिर्डी दौऱ्यावर असताना सिन्नरला जाऊन ज्योतिषाकडे भविष्य पाहिल्याचा आरोप झाला.
आमचं सरकार पडलं पाहिजे म्हणून अनेक जण देव पाण्यात घालून बसले आहेत. आपलं सरकार पारदर्शी आहे. लोकांचं सरकार लोकांना पडतं आहे. आमच्यावर विश्वास ठेवून लोकं आम्हाला पाठिंबा देत आहेत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात सरकार पडेल असं सांगितलं जातं आहे. पण वर्ष सांगितलं जात नाही. आमचं सरकार स्थापन झाल्यापासूनच अनेकजण देव पाण्यात घालून बसले आहेत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
फेब्रुवारी महिन्यात सरकार कोसळणार असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्याबाबत विचारलं असता, कोणत्या वर्षातला फेब्रुवारी महिना? हे टीका करणारे लोक सांगत नाहीत. सरकार स्थापन झाल्यापासूनच हे सरकार आज पडेल, उद्या पडेल असं सांगत अनेक जण देव पाण्यात घालून बसले आहेत. आमच्याकडे १७० आमदारांचं बळ आहे. लोकप्रिय सरकार आहे. लोकांचं काम करणारं सरकार आहे. आम्ही सत्तेत आल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या छातीत धडकी भरली आहे. दोन-चार महिन्यात हे इतकं काम करत आहेत तर दोन वर्षात किती करतील. त्यानंतर आमच्या पक्षांचं काय होईल? ही चिंता त्यांना सतावते आहे म्हणून अशा तारखा दिल्या जात आहेत. कार्यकर्ते-पदाधिकारी आपल्याकडे थांबणार नाहीत, ते थांबले पाहिजेत म्हणून अशा तारखा देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो आहे. आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. पुढच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांचंच सरकार निवडून येईल असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मागच्या अडीच वर्षात काय काम केलं? त्यांच्याकडे सांगायलाच काही नाही. त्यामुळे ते आमची बदनामी करत आहेत. आमच्यावर आरोप करत आहेत. काही हरकत नाही. आम्ही काम करत राहू. लोक आम्हाला आमच्या कामाची पोचपावती त्यांच्या कृतीतून देते आहे. जनता आमच्या बरोबर आहे. येणाऱ्या सगळ्या निवडणुका आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपमधूनच लढणार आहोत. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे हे आज नागपूरमध्ये परतले आहेत. सुप्रीम कोर्टात सीमावादाचा जो विषय आहे त्याचा निकाल महाराष्ट्राच्याच बाजूने लागेल हा मला विश्वास आहे. मी अमित शाह यांची या प्रश्नी भेट घेतली आहे. मी सीमा प्रश्नासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे शौर्य दिवसासाठी मला बोलावलं होतं. मी त्यासाठी नागपूरहून दिल्लीला गेलो होतो असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. एवढंच नाही तर काही लोक जाणीवपूर्वक महाराष्ट्राची बदनामी करत आहेत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.