दरवेळी भाजपची बाजू घेणार्या केंद्रीय मंत्र्यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं
मुंबई, १२ डिसेंबर २०२२: भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद सर्वत्र पडल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी काल चिंचवड येथे पाटील यांच्यावर शाईफेकीचा प्रकार देखील घडला. दरम्यान याप्रकरणी भाजपमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत.
केंद्रात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. रामदास आठवले यांनी ट्विट करत भीक या शब्दाचा केलेला वापर अत्यंत चुकीचा आहे. सामाजिक क्रांती करणाऱ्या महापुरुषांचा अवमान आहे. आम्हाला चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या नेत्यांकडून ही अपेक्षा नव्हती. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी आपले शब्द मागे घ्यावेत समाजाप्रती दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी केली आहे.
दुसऱ्या एका ट्विट मध्ये रामदास आठवले म्हणाले आहेत की, “तू मागू नकोस भीक .. तू शीक असाच संदेश महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा होता. दलीतमुक्तीचा लढा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारला. त्यांचे जीवन आणि समग्र कार्य हे स्वाभिमानावर आधारलेले आणि स्वाभिमानाची शिकवण देणारे आहे.”
चंद्रकांत पाटील काय म्हणाले..चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत, असं विधान केलं. यानंतर त्यांच्या या विधानाचे सर्वत्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले.