वक्तव्य भोगणार ; महिला आयोगाची रामदेव बाबांना नोटीस

पुणे, २५ नोव्हेंबर २०२२ : योग गुरू रामदेव बाबा जाहीर कार्यक्रमात केलेल्या बेताल वक्तव्य आता त्यांना भोवणार आहे. राज्य महिला आयोगाने रामदेव बाबांना नोटिस बजावली असून दोन दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

पतंजलि योगपीठ आणि मुंबई महिला पतंजलि योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन शुक्रवारी ठाण्यातील हायलँड भागात करण्यात आले होते.
हास्य विनोद करत रामदेव बाबा यांचे योग शिबीर सुरू होते त्यावेळी ते महिलांच्या कपड्यावर बोलत असताना जिभ घसरली. राज्यात यापूर्वीही राज्यात एका मागे एक वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच आहे.

संभाजी भिडे गुरूजी यांनी महिलांच्या टिकलीबदद्ल वक्तव्य केल्याने वाद सुरू झाला. त्यांनाही महिला आयोगाने नोटिस बजावली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला पत्रकार साडी का घालत नाहीत असे अजब वक्तव्य केले. हा वाद संपत नाही तोवर रामदेव बाबा यांचे वक्तव्य समोर आले त्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.
ठाण्यात आयोजित योग शिबिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासमोर धक्कादायक वक्तव्य केले.
“महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिल्यास काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात.” असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे. या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला पण या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र पडसाद उमटत आहेत. याची दखल घेत राज्य महिला आयोगाने नोटीस बजावून दोन दिवसात खुलासा करा असे आदेश दिले आहेत.