अंधेरी पोटनिवडणुकीत नोटा नावाच्या बेडकीचा बैल करण्याचा भाजपचा डाव होता – डॉ. नीलम गोऱ्हे यांची टीका

पुणे, 6 नोव्हेंबर 2022: अंधेरी पोटनिडणुकीत ऋतुजा लटके यांना मिळालेला भरघोस पाठिंबा ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील मुंबईकरांच्या असलेल्या प्रेमाची आणि विश्वासाची पावती आहे. या निवडणुकीत भाजपाने नोटाचा प्रचार करून बेडकाचा बैल करण्याचा प्रयत्न केला अशी खरमरीत टीका विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज केली.

कसबा मतदार संघातील शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या दिवाळी फराळ आणि स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात पत्रकारांशी डॉ. गोऱ्हे यांनी संवाद साधला.

नोटा म्हणजे एक प्रकारे शिवसेनेच्या विजयाला कलंकित करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, यामागे कोणी प्रयत्न केले हे सर्वांसमोर आहे. या प्रकारची निवडणूक ही संवेदनशील पद्धतीने लढवली जाते, अश्यावेळी जातीच्या प्रमाणपत्राचा निकाल ज्यांच्या विरुद्ध गेला अश्या नेत्यांना पुढे करून भाजपने रडीचा डाव खेळला हे अगदी स्पष्ट आहे.लटके यांचा विजय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जनतेची सहानुभूती आणि पाठिंबा कायम असल्याचा कौल मुंबईकरांनी आज दिला असल्याचे प्रतिपादन करताना, डॉ. गोऱ्हे असेही म्हणाल्या की विद्यमान सरकारच्या कामकाजाबाबत जनतेमध्ये असलेली नकारात्मकता त्यांनी मतपेटीच्या माध्यमातून दर्शविलेली आहे.

याप्रसंगी, शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन पंडित, चंदन साळुंखे, संजय गायकवाड, जावेद खान आदी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.