छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट काढताना इतिहासाची मोडतोड

पुणे, 6 नोव्हेंबर 2022:  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारलेला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. तसेच, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा सुद्धा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांवरून संभाजीराजे छत्रपती संतापले आहेत. चित्रपटातून इतिहासाची मोडतोड होत आहे. शिवरायांच्या इतिहासाचा विपर्यास करण्यात येत आहे, असा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला.

संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “इतिहासाचे सिनेमा निघत असून, ही कौतुकाची बाब आहे. राजस्थानचे महाराणा प्रताप घराणे सोडले, तर इतिहासाच्या संदर्भात चित्रपट निघाले आहेत. ते चित्रपट इतिहासाची मोडतोड करुन काढले जात आहेत, ठिक आहे. पण, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांबाबतच्या चित्रपटांबद्दल चालणार नाही,” असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.