योग्य वेळी मंत्रीमंडळ विस्तार होईल : एकनाथ शिंदे

नागपूर, २५ ऑक्टोबर २०२२: एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आलं. सुरुवातीला महिनाभर दोघांनीच कारभाराचा गाडा हाकला. त्यानंतर पहिला विस्तार केला. तेव्हापासून मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्ताराची प्रतिक्षा आमदारांना लागली आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सांगितले. तसे सूतोवाच त्यांनी केले. पण हाच प्रश्‍न आज मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी यावर ठामपणे काही सांगितले नाही.

या विस्तारात राज्यमंत्र्यांचाही शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री शिंदे आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तेथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने आमदारांमध्ये अस्वस्थता आहे का, असा प्रश्‍न त्यांना विचारला असता, विस्तार होईल, योग्य वेळी सर्व गोष्टी होत असतात, असे मोघम उत्तर त्यांनी दिले आणि या विषयावर अधिक बोलण्याचे टाळले. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारमध्ये मतभेद तर नाहित ना, असा प्रश्‍न चर्चिला जात आहे. त्यातच अमरावतीमध्ये आमदार रवी राणा आणि माजी राज्यमंत्री, आमदार बच्चू कडू यांच्यात मंत्रिपदासाठीच संघर्ष सुरू आहे. राणा फडणवीसांचे तर कडू हे शिंदे गटाचे आहेत. त्यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला आहे, की शिंदे आणि फडणवीसांना त्यात मध्यस्थी करावी लागली.

सद्यस्थितीत राज्याच्या मंत्रिमंडळात शिंदे आणि फडणवीस यांच्याशिवाय १८ कॅबिनेट मंत्र्यांचाच समावेश आहे. यामध्ये शिंदे गटाचे नऊ, तर भारतीय जनता पक्षाचे नऊ मंत्री आहेत. त्यामुळे कॅबिनेट मंत्र्यांच्या जोडीला आता राज्यमंत्रीही नव्या विस्तारात असतील, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आमदार संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी पहिल्या विस्तारानंतर उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. त्यामुळे त्यांचा क्रमांक आधी लागतो का, हे बघणेही तेवढेच औत्सुक्याचे असणार आहे.

आपले पोलिस जिव धोक्यात घालून काम करीत असतात. त्यातल्या त्यात गडचिरोली जिल्ह्यात काम करणाऱ्या पोलिसांच्या जिवाला क्षणोक्षणी धोका असतो. त्यातही ते उत्तम काम करीत आहेत. आपण त्यांच्यासोबत सण साजरे केल्याने त्यांचे मनोबल वाढते, लढण्याची उर्मी निर्माण होते, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे आज गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे जाऊन चेकपोस्टवर पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मी गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री असतानाही दरवर्षी पोलिसांसोबत दिवाळी साजरी करीत होतो. आता मुख्यमंत्री आहे तरीही त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार आहे. त्यांच्यासोबत आनंद वाटून घेण्यासाठी मी भामरागडला आलो आहे. पोलिसांचे मनोबल वाढल्याने गडचिरोलीमध्ये नक्षलवाद कमी होत चालला आहे.

नाना पटोले यांनी राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. याबाबत विचारले असता मुख्यमंत्री शिंदे हसले आणि म्हणाले, पटोलेंची मागणी हास्यास्पद आहे. कारण आज राज्यात बहुमताचे, भक्कम पाठींबा असलेले सरकार स्थापन झाले आहे. तीन महिन्यांत आम्ही ७२ मोठे निर्णय घेतले. ग्रामपंचायत निवडणूकीत भापजप ३९७ जागांवर तर आमच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने २४३ ग्रामपंचायतींवीर सरपंच निवडून आणले आहे. आताही इतर सरपंच येऊन भेटत आहेत. आकडा वाढतो आहे. त्यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. विरोधी पक्ष टिका करतात, ते त्यांचे कामच आहे. पण आम्ही टिकेला टिकेने नव्हे तर कामाने उत्तर देऊ, असे ते म्हणाले.

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नुकसान भरपाईसाठी हेक्टरची मर्यादा वाढवली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला पूर्व विदर्भात चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात पूर्व विदर्भाला स्थान मिळेल का, असे विचारले असता, केवळ पूर्व विदर्भच नव्हे तर सगळ्यांचाच विचार विस्तारात केला जाईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. समृद्धी महामार्गाबाबत विचारले असता, शिर्डी ते नागपूर लवकरच प्रवास सुरू होईल, असे ते म्हणाले.

दिवाळीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावले होते. दिपोत्सवासाठी आम्ही गेलो होतो. यावर्षी राज्यात सर्व सण आनंदाने साजरे होत आहेत. त्याचा आनंद आज राज्यभरात बघायला मिळतो आहे. ठाकरेंसोबत राजकीय चर्चा नव्हती, सण आणि उत्सव येवढ्याच विषयांवर त्यांच्याशी बोलणे झाले, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.