पुण्यात एकनाथ शिंदे गटाला बळ, शिवसेनेला गळती – माजी शहर प्रमुख अजय भोसले, किरण साळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत
पुणे, १० जुलै २०२२: शिवसेनेचे आमदारांनी बंड केल्यानंतर या बंडाला पुण्यातून फारसा पाठिंबा मिळालेला नव्हता. मात्र पुण्यातून शिवसेनेला गळती लागण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अजय भोसले, माजी नगरसेवक नाना भानगिरे, युवा सेनेचे सहसचिव किरण साळी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला.
ठाकरे यांच्याकडून पुण्याला सावत्र वागणूक दिल्याने आम्ही शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा बंड नाही तर उठाव आहे, अशी भूमिका या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, शनिवारी लोहगाव विमानतळावर खासदार गिरीश बापट यांच्यासह माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, अजय भोसले, किरण साळी यांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले.
आषाढी एकादशीनिमित्त शासकीय पूजेसाठी एकनाथ शिंदे लोहगाव विमानतळावरून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. त्यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला। अजय भोसले हे पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत, त्यांनी शिवसेनेकडून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तसेच त्यांचे मातोश्रीवर देखील निकटचे संबंध होते. तर किरण साळी हे युवासेनेच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीत काम करत आहेत. आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते. या दोन्ही पदाधिकाऱ्यांसह युवासेनेचे विद्यापीठ कक्षाचे उपाध्यक्ष आकाश शिंदे यांनी आज पदाचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
अजय भोसले म्हणाले, आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतच आहोत. आम्ही कोणते बंड केलेले नाही तर आम्ही हा केलेला उठाव आहे.
किरण साळी म्हणाले, युवासेनेच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीत काम करताना आदित्य ठाकरे यांच्याकडून पुण्याला सावत्र वागणूक मिळाली. प्रयत्न करूनही पुण्यासाठी त्यांनी वेळही दिला नाही. पण माजी मंत्री उदय सामंत एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांना बळ दिले. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही हिंदुत्व सोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहोत.
शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे म्हणाले, जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक नाहीत असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे जे एकनाथ शिंदे सोबत गेले आहेत त्यांचा आणि शिवसेनेचा आता काही संबंध राहिलेला नाही व आम्हाला काही फरक ही पडत नाही.