सत्ता स्थापनेचा पुण्यात जल्लोष नाहीच
पुणे, ६ जुलै २०२२ : महाविकास आघाडी सरकारकडून त्या ऐवजी शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थापन झाले. पण पुण्यात भाजपकडून या सरकार स्थापनेचा जल्लोष करण्यात आलाच नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात आले पण त्यांचे जंगी स्वागत कोणीही केलेले नाही. त्यामुळे नेमके पुण्यात चालले काय असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस यांना नाईलाजास्तव उपमुख्यमंत्री होण्याची वेळ आली. फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत हे निराशादायी होतेच, पण त्यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घ्यावी लागले हे भाजप कार्यकर्त्यांसाठी दुःखदायक होते.त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आनंदात विरजण पडले. ठाण्यामध्ये जंगी स्वागत करण्यात आले हे स्वाभाविक होतेच, पण देवेंद्र फडणवीस नागपूर मध्ये गेल्यानंतर विमानतळापासून त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली हे विशेष होते.
पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून येतात. राज्यातील ठाकरे सरकार पाडून त्या ऐवजी भाजपची सत्ता असलेले सरकार आणण्यात चंद्रकांत पाटील यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांचे पुण्यामध्ये जंगी स्वागत केले जाईल अशी अपेक्षा होती. पण शहरामध्ये तसे काही घडलेले नाही, उलट चंद्रकांत पाटील यांनी एक व्हिडिओ जारी करून त्यामध्ये सत्ता स्थापनेचा आनंद सगळ्यांना झालेला आहे, पण गुलाल उधळून, फटाके फोडून, दहा दहा हजाराचे मोठे हार घालून जल्लोष साजरा करू नका. पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.
पुण्यात भाजपचे १०० माजी नगरसेवक आहेत, एक खासदार आहेत, चंद्रकांत पाटील यांच्यासह ६ आमदा असूनही सरकार स्थापन होऊन तीन दिवस झाले तरी जल्लोष नाही, पेेढे वाटले नाहीत, अभिनंदनाचे फ्लेक्स, होर्डिंग सुद्धा लागली नाहीत.
विरोधी पक्षाचे अजित पवार यांनी सभागृहात भाषण करताना “दादा तुम्ही जास्त बाकडे वाचू नका अजून तुमचेच मंत्रीपद फिक्स नाही” असा टोला चंद्रकांत पाटील यांना मारला होता. त्यामुळेच पुण्यात जल्लोष साजरा केला जात नसावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.