गृहमंत्री आहेत का झोपले? धाराशिवमध्ये मनोज जरांगेंनी फोटोच दाखवले
धाराशिव, ११ जानेवारी २०२५: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख याचे अपहरण आणि निर्घृण हत्येला ३५ दिवस उलटले आहेत, तरी देखील अद्याप एक आरोपी फरार आहे. दुसरीकडे संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहेत, अशातच आज धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील लक्ष केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी काही फोटो दाखवतं काही प्रकरणांची माहिती देत सरकारवर हल्लाबोल केला आहे.
धाराशिवमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. मुख्यमंत्री साहेब सरकार म्हणून आम्ही तुमच्यावर थुंकतो. बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक करा, आरोपीला जन्म ठेप होत नाही तोपर्यंत त्याची सुटका होता कामा नये. सर्व आमदारांनी या लेकीला न्याय द्या, हे सुटले तर तुमच्या मागे मी लागेल. अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस तुमच्या मंत्रिमंडळातील नेत्याच्या पैदाशीचे हे प्रताप आहेत. केजमध्ये ही पोरीला मारून टाकले, मुंडे यांच्या कार्यकर्ते यांचे प्रताप आहेत, मी कधी त्यांचं नाव घेत नाही. मात्र धनंजय देशमुख यांना धमकी दिल्यानंतर मी नाव घेतलं, धनंजय मुंडेंनी टोळ्या पाळल्या आहेत. यांनी लोकं मारायचं ठरवलं आहे. यांना जातीशी देणेघेणे नाही. कोणावर हल्ला करायची गरज नाही, मात्र प्रतिउत्तर दिल्याशिवाय शांत बसायचं नाही, तुमच्या कुटुंबाचे तुम्हाला रक्षण करावं लागणार आहे. यांना थांबवायचं नसेल तर आपला नाईलाज आहे, हे फक्त मुटभर आहेत असं म्हणत सरकारला मनोज जरांगे यांन इशारा दिला आहे.
जरांगे यांनी धाराशिवमध्ये स्टेजवरून एक फोटो दाखवला. तो फोटो एका मृतदेहाचा होता, त्याचा चेहरा देखील व्यवस्थित दिसत नव्हता, तो मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. माणूसकीची हत्या कशी केली ते पाहा म्हणत त्यांनी तो फोटो जमलेल्या लोकांना दाखवला. त्याचवेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस तुमच्या मंत्रीमंडळात असलेल्या नेत्याच्या गुंडानी केलेले हे प्रताप आहेत. काय वाटलं असेल या बापाला. मी हे असे फोटो कधी दाखवत नाही. मला त्या तीन वर्षांच्या लेकीचं ऐकलं आणि हे पाहिलं याचा खून झाला आहे आणि अद्याप आरोपी अटक नाही. तुमच्या धाराशिवची ही घटना आहे. गृहमंत्री आहेत की झोपलेत. हे प्रताप आहेत तुमच्या पक्षातील संविधानाच्या पदावर बसलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे प्रताप, असं म्हणत मनोज जरांगे यांनी या घटनेवरती संताप व्यक्त केला आहे.
इथून पुढे राज्यातील गोरगरीब जनतेने मला येऊन तुमच्या व्यथा सांगा, मी आहे यांच्या डोक्यावर पाय द्यायला असंही म्हटलं आहे. तुम्ही सगळं आंतरवालीला आणून द्या २५ तारखेच्या नंतर या सर्वांचा मी कार्यक्रम लावतो म्हणत मनोज जरांगे यांनी इशारा दिला आहे. त्यानंतर पुढे जरांगे यांनी आणखी एक फोटो दाखवला,आणि म्हणाले ही घटना केजमधील आहे. केजमध्ये देखील एक मुलगी मारून टाकली. आरोपी फरार आहेत. बाहेर दारू पीत आहेत, अद्यापही ते आरोपी फरार आहेत. हा देखील धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला गुन्हा आहे. ते असे मोकाट फिरत आहेत, असंही पुढे जरांगे म्हणालेत.
या राज्यातील लोकांनी आता जागे होणे गरजेचे आहे. मी कोणाला काहीही बोललो नाही. त्या धन्या मुंडेचं मी कधी नाव घेतलं नाही. जो लोकांच्या पोरी छेडायला सांगतो, असल्याचं तोंडावर पण आम्ही नाव सुद्धा घेत नाही. पण त्या दिवशी धनंजय देशमुख यांना पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली, त्या दिवसापासून मी धनंजय मुंडेच्या मागे लागलो, आणि एकदा मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडत नाही. आपला रूल तसा आहे, मी २५ तारखेपर्यंत आता शांत आहे. मी तोपर्यंत काहीही बोलणार नाही. लेकरांच्या हाता- तोंडाला आलेला आरक्षणाचा आरक्षणाचा घास आहे, २५ तारखेपासून अमरण उपोषण,आणि आरक्षण मिळालं. मग परळी पासून मुंबई पर्यंत सगळं काढतो. कोण कसा सुटतो ते मी बघतो असंही पुढे जरांगे यांनी म्हटले आहे.