पुण्यातील महंमदवाडीचे नाव बदलून महादेववाडी होणार ? मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे, ३० सप्टेंबर २०२२: ः राज्यातील सरकार बदलल्यानंतर शहरांच्या नामांतरावरून वाद सुरू असताना पुण्यात देखील आता एका भागाचे नाव बदलण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. हडपसर भागातील महंमदवाडी या भागाचे नाव महादेववाडी करा अशी मागणी शिंदे गटाचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी केली आहे. त्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक वर्षापासून औरंगबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याची मागणी होत होती. पण प्रत्यक्षात हा निर्णय होत नव्हता. उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात आल्यानंतर त्यांनी या दोन्ही शहराच्या नामांतराच्या प्रस्तावास मान्यता दिली. त्यावरून राज्याच्या राजकारणात पडसाद उमटले. पण सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांनी उद्धव ठाकरे यांचा निर्णय रद्द केला व औरंगाबादचे नाव फक्त संभाजीनगर न ठेवता छत्रपती संभाजीनगर असे केले. त्यावरूनही दोन्ही गटांमध्ये चांगलेच वाक युद्ध पेटले होते.
हा वाद अद्याप संपलेला नसताना आता पुण्यात महंमदवाडीचे नाव महादेववाडी करा अशी मागणी पुढे आली आहे. महंमदवाडी हा भाग हडपसर या परिसरात आहे, या भागात मुस्लीमांची संख्याही मोठी आहे. पण या भागातील नागरिकांनी १९९७ मध्ये युतीचे सरकार असताना महादेववाडी असे नामांतर करा अशी मागणी केली होती. पण त्याकडे कोणत्याही सरकारने लक्ष दिले नव्हते.
आता राज्यात शिंदे सरकार आले आहे, हे हिंदूत्ववादी विचारांचे सरकार असल्याचे सांगितले जात असल्याने नाना भानगिरे यांनी हा मुद्दा पुढे आणला आहे. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.
नाना भानगिरे म्हणाले, ‘‘११९७ पासूनच ग्रामस्थांनी आमच्या गावाचे नाव महंमदवाडी ऐवजी महादेववाडी करावे अशी मागणी केली होती. तसा प्रस्ताव युतीचे सरकार असताना पाठविला होता. पण तो मान्य करण्यात आला नाही. आता एकनाथ शिंदे सरकार याबाबतचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.