मी काय खेळणं आहे का तुमच्या हातातलं? मंत्री न झालेले नाराज भुजबळ कडाडल
नागपुर, १७ डिसेंबर २०२४ : राज्यात १४ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. मात्र, यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालेलं नाही. त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आलीय. माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मंत्रिपदाचा प्रश्न नाही अवहेलना झाली. पद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल. उमेदवारी देतानाही वाट पाहावी लागली, यापुढे वाट पाहणार नाही. माझ्या मंत्रिपदासाठी फडणवीस आग्रही होते. मी लोकसभा मागितली राज्यसभा मागितली दिली नाही.महाराष्ट्रात गजर म्हणून मला विधानसभा लढायला सांगितली.
चार सहा महिन्यांपूर्वी मी राज्यसभेवर पाठवा म्हणून सांगितलं होतं. तेव्हा माझं ऐकलं नाही. आणि आता मला सांगत आहेत. मी काय लहान खेळणं आहे का तुमच्या हातातलं? असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केलाय. चर्चा करू, बसू असे म्हणाले पण चर्चेला बसलेच नाही. प्रफुल पटेलांशी फोनवर बोलून सर्व ठरवतात. माझ्या समर्थकांच्या भूमिका मी सध्या ऐकून घेतोय, असे म्हणत मी काय तुमच्या हातातलं लहान खेळणं आहे का? आमदारकी सोडली तर, मतदारसंघातल्या लोकांना काय वाटेल असं देखील छगन भुजबळ म्हणाले आहेत.
राज्यात सध्या वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी महायुतीच्या नव्या सरकारमधील ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपचे १९ मंत्री, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) ११ आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार) ९ मंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये बऱ्याच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. यामध्ये काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आल्याचं समोर आलंय.
मंत्रिमंडळातून वगळल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज झालेत. मला मंत्रिपद कोणी नाकारलं, हे शोधण्याचा प्रयत्न छगन भुजबळ करत आहे. भुजबळांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून त्यांच्या समर्थकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचं वातावरण आहे.