एकनाथ शिंदेंनी शहांसोबतची बैठक टाळली, फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली, १२ डिसेंबर २०२४ ः राज्यात नवं सरकार स्थापन होऊन आठवडा उलटला तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. महायुतीतील घटक पक्षांमध्ये खातेवाटपावरून तिढा असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदावरून नाराज असल्याचं बोलल्या जातंय. या सर्व चर्चांवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीत कोणताही तिढा नाही. एकनाथ शिंदेंचं दिल्लीत काम नसल्याने ते दिल्लीला आले नाहीत. मात्र, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे फडणवीसांना सांगितलं.

गुरुवारी सकाळी फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची दिल्लीतील ७ लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली. यानंतर महाराष्ट्र सदनात प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, माध्यमांनी माझ्या आणि अजित पवारांच्या दिल्लीत आल्याबद्दल अनेक बातम्या चालवल्या. मी त्या पाहिल्या आहेत, पण मला एक गोष्ट सांगायची आहे. अजित पवार त्यांच्या कामासाठी दिल्लीत आले आहेत, तर मी माझ्या कामासाठी आलोय. आमच्या दोघांची कालपासून भेट झालेली नाही. एकनाथ शिंदे यांना दिल्लीत काम नसल्याने ते दिल्लीत आले नाहीत. महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळाबाबत कोणतेही तिढा नाही. काल रात्री मी अमित शहा, बी.एन. संतोष आणि जेपी नड्डा यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. मंत्रिमंडळात कोणाला संधी द्यायची याचा निर्णय अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजप नेते स्वतंत्रपणे घेतील, असं फडणवीस म्हणाले.

भाजपकडून मंत्रिपदासाठी प्रत्येक खात्यासाठी कोणता मंत्री असू शकतो, यासाठी काही नावं निवडण्यात आली. आता भाजपचे वरिष्ठ नेते त्याबाबत अंतिम निर्णय घेतील, असं फडणवीस यांनी सांगितले. फडणवीसांनी मोदींसोबतच्या भेटीचा तपशीलही प्रसारमाध्यमांना दिला. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना भेटावे लागते, असे संकेत आहेत. आज सकाळी पंतप्रधान मोदींसोबत प्रदीर्घ भेट झाली. मी त्यांचे आशीर्वाद घेतले आणि महाराष्ट्रासंदर्भात चर्चा केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. येथील अर्थव्यवस्थेला गती देणं गरजेचं आहे. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला पूर्ण पाठिंबा देण्यास तयार असल्याचे सांगितलं, असं फडणवीस म्हणाले.

मोदींना शिवरायांची प्रतिमा भेट दिली…
ते म्हणाले, पंतप्रधान मोदीजी हे आमच्यासाठी पितृतुल्य आहेत.ते आमच्यावर प्रेमही करतात, चुकलो तर रागावतातही. त्यांना भेडणं ही नेहमीच आनंदाची गोष्ट आहे. मोदीजी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच आज मी त्यांना छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट दिल्याचे फडणवीस म्हणाले.

शरद पवारांना आमच्याकडूनही शुभेच्छा…
आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही चांगली गोष्ट आहे. आमच्याकडून शरद पवार यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच आमची मनोकामना आहे, असं फडणवीस म्हणाले.