तर ठरलं; ‘मी पुन्हा येणार… पुन्हा येणार… पुन्हा येणार…’ ही फडणवीसांची घोषणा उतरली सत्यामध्ये
पुणे, ४ डिसेंबर २०२४ : महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स आता पूर्णपणे संपलेला आहे. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एकमत करण्यात आले त्यानंतर भाजप आमदारांच्या बैठकीत देखील एकमताने फडणवीस यांच्या नावावर सर्वांनी सहमती दर्शवली. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला असून ‘मी पुन्हा येणार… पुन्हा येणार… पुन्हा येणार…’ ही घोषणा फडणवीस यांनी सत्यात उतरवली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला १३२ जागांवर विजय मिळाला. बहुमता पासून अवघ्या काही जागा दूर असताना भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालेले आहे. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन जवळपास आठवडा झाला तरी भाजपला मुख्यमंत्री ठरवता आलेला नव्हता. दिल्ली आणि मुंबईमध्ये यासाठी अनेक बैठका झाल्या देवेंद्र फडणवीस यांची लगेच नियुक्ती होईल अशी अपेक्षा होती. पण पक्ष नेतृत्वाने यासाठी बराच वेळ घेतलेला आहे.
भाजपचा विधिमंडळ नेता ठरवण्यासाठी केंद्रीय भाजप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाने यांना केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात पाठवले आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आज सकाळी दहा वाजता कोर कमिटीची बैठक सुरू झाली. यामध्ये चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाण यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्यास अनुमोदन देण्यात आले. त्यानंतर फडणवीस यांची नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर विधिमंडळात आमदारांची बैठक झाली यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रास्तावित केले. या बैठकीत देखील सर्व आमदारांनी जल्लोषांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावास अनुमोदन दिले.