महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आज ठरणार

मुंबई, ४ डिसेंबर २०२४: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून ११ दिवस झाले असले तरीही भाजपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण हे ठरवता आलेले नव्हते. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या राजीनामा नाट्यमुळे महायुती मधील मतभेद चव्हाट्यावर आलेले आहेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना होणारा विरोध आणि दुसरीकडे शिंदे यांची राजीनामा नाट्य यात बराच काळ निघून गेलेला आहे. त्यानंतर आज भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये विधानसभेतील भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे यात देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचीच जास्त शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला यामध्ये महायुतीला २३० जागांचे स्पष्ट बहुमत मिळालेले आहे तर १३२ जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आलेला आहे. बहुमतासाठी लागणारे १४३ आमदार भाजपकडे सहज उपलब्ध असताना ते मुख्यमंत्री पद शिवसेनेला म्हणजेच एकनाथ शिंदे यांना सोडणार नाहीत हे स्पष्ट झालेले होते. तरीही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी आग्रह कायम ठेवला. मुख्यमंत्री पद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी गृहमंत्री पद मिळावे यासाठी या तीन-चार दिवसांपासून दबाव तंत्र सुरू केलेले आहे. एकीकडे हा तिढा निर्माण झालेले असताना भाजपच्या पक्ष नेतृत्वाने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्यास बराच वेळ घेतलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री केल्यास राज्यात सामाजिक वातावरण बिघडेल, मराठा आंदोलनाची धार पुन्हा एकदा तीव्र होईल अशी शक्यता वर्तवली गेली. त्यामुळे रवींद्र चव्हाण मुरलीधर मोहोळ या भाजपच्या दुसऱ्या फळातील नेत्यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी समोर आलेली होती. मात्र, या दोघांनीही आपण मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नसल्याचे समाज माध्यमावरून स्पष्ट केलेले आहे.

देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी भाजपचे बहुसंख्य आमदार पदाधिकारी यांची इच्छा आहे. पण भाजपच्या कार्यपद्धतीनुसार हा निर्णय लोकशाही पद्धतीने घेतला जातो गटनेता निवड करण्यासाठी आज भाजपची बैठक होणार आहे. यासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून विजय रूपानी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या दोघांच्या उपस्थितीमध्ये आमदार त्यांच्या घटनेचा कोण असला पाहिजे हे मत व्यक्त करतील त्यानंतर त्याचा अहवाल केंद्रीय नेत्यांना सोपविला जाईल.

पाच डिसेंबर म्हणजे उद्या सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा आयोजित केलेला आहे. त्यामुळे भाजपकडून आजच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर होणे अपेक्षित आहे.