एकनाथ शिंदे यांची तलवार म्यान, भाजपचा मुख्यमंत्री होणार

मुंबई, २७ नोव्हेंबर २०२४ : मी कोणतीही गोष्ट ताणून धरलेली नसून राज्यात सत्तास्थापनेसाठी आमची कोणतीही अडचण नसणार, त्यामुळे मोदींनी अंतिम निर्णय घ्यावा, या शब्दांत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय. विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर अद्यापही राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होत नसल्याने विविध चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर अखेर आज एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील राहत्या घरातून पत्रकार परिषद घेत स्पष्टपणे सांगून टाकलंयं.

एकनाथ शिंदे म्हणाले, मी कधीही कोणतीही गोष्ट ताणून धरलेली नाही, राज्यात माझी लाडका भाऊ अशी माझी ओळख आहे, मी पंतप्रधान मोदींना काल फोन केला, त्यांना सांगितलं की सरकार बनवताना माझ्यामुळे काही अडचण आहे, असं वाटत असेल तर तुम्ही असं मनात आणू नका, तुम्ही निर्णय घ्या. एनडीएचे प्रमुख नेते म्हणून तुम्ही निर्णय घ्या. आम्हाला तो निर्णय मान्य असेल. सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदेंची कोणतीही अडचण नसणार आहे, असंही एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय.

महायुतीने लॅंड्स्लाईड विजय मिळवला. महायुतीवर जनतेचा विश्वास आहे. राज्यात विकास अन् कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातलीयं. राज्यात महाविकास आघाडीने थांबवलेली कामे महायुतीने पुढे नेली आहेत. अनेक प्रकल्प कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या असून अगदी साधा कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी स्वत:ला सर्वसामान्य माणूस समजत होतो. पायाला भिंगरी लावून मी काम केलं, सीएम म्हणजे कॉमन मॅन हे मी सिद्ध केलं, असल्याचं शिंदे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना हे कळणार नाही. उठाव केला तेव्हापासून अमित शाहा आणि मोदी पूर्ण ताकदीने उभे राहिले आहेत. महाविकास आघाडीच्या काळात तीन नंबरला गेलेलं राज्य आम्ही एक नंबरवर आणलं. विकासकामांमुळे आमच्यावर मतांचा वर्षांव झाला आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जनतेसाठी काम करेन
आम्ही नाराज होऊन रडणारे नाही तर लढणारे लोकं आहोत, अशी टोलेबाजी शिंदेंनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केलीयं.