पैसे वाटप राड्यानंतर तावडेंनी मांडली त्यांची बाजू

मुंबई, १९ नोव्हेंबर २०२४ ः विधानसभा निवडणूक मतदानाच्या एक दिवस आधी विरारमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. एका हॉटेलमध्ये भाजपाचे नेते विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली. यासंदर्भातील काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. तसेच बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. जवळपास तीन ते चार तास हा संपूर्ण गोंधळ सुरु होता. या संपूर्ण प्रकरणानंतर विनोद तावडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच माध्यमांशी संवाद साधताना विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याच्या सर्व बातम्या खोट्या असल्याचं विनोद तावडेंनी म्हटलं आहे.

विनोद तावडे म्हणाले, “मी चाळीस वर्षांच्या राजकारणात एक दमडी वाटली नाही. मी हितेंद्र ठाकूर यांचं मत विधानपरिषदेत मिळवलं होतं. आता दुपारी मला हितेंद्र ठाकूर यांनी सोडलं. त्यांना काही थोडीफार शंका आली असेल त्यामुळे त्यांनी काही केलं असेल तर निवडणूक आयोगाने चौकशी करावी. पैसे वाटपाच्या आरोप प्रकरणानंतर तीन गुन्हे दाखल झाले आहेत. एक गुन्हा असा दाखल झाला आहे की, आम्ही दोघांनी (हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे) मिळून पत्रकार परिषद घेतली. दुसरा गुन्हा असा दाखल झाला की मी माझा मतदारसंघ नसताना त्या ठिकाणी गेलो. तिसरा गुन्हा असा दाखल झाला की, हितेंद्र ठाकूर हे मतदारसंघ नसताना त्या ठिकाणी आले. हे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. पैशाचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही”, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

पैसे वाटप आरोप प्रकरणानंतर प्रतिक्रिया देताना विनोद तावडे यांनी म्हटलं की, “पैशासंदर्भातील सर्व बातम्या खोट्या आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं की भाजपाच्या नेत्यांनी टीप दिली हे देखील खोटं आहे. आता या आरोपानंतर हितेंद्र ठाकूर गाडीत जाताना काय बोलले ते मला माहिती आहे. त्यामुळे यात काहीही तथ्य नाही”, असंही विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

“मी प्रचार संपल्यानंतर लोकांना भेटत असतो. त्या अनुषंगाने मी राजन नाईक यांना फोन केला की काय परिस्थिती आहे? तर ते म्हणाले की, सर्व व्यवस्थित सुरु आहे. आम्ही या ठिकाणी बसलो आहोत तर चहाला या. आम्ही त्या ठिकाणी चहा घेण्यासाठी गेलो. एवढं साधं आहे. पण शंका आली आहे ना? तुम्ही पैसे तपासा, सीसीटीव्ही तपासा, काही मिळालं तर कारवाई करा. माझं काहीही म्हणणं नाही”, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीच्या बाबतीत मी याआधीच म्हटलं की फक्त राष्ट्र, नो महाराष्ट्र. आता मी आज विरारला जाणार आहे हे पक्षात देखील कोणाला माहिती नव्हतं. त्यामुळे कोणताही विषय नाही. माझी प्रतिमा मलिन होण्याचंही काही कारण नाही, असंही तावडे यांनी म्हटलं.