शरद पवार, सुळे गुजरातचे राजदूत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका

पुणे, १५ नोव्हेंबर २०२४: खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे हे गुजरात राज्याचे राजदूत असल्यासारखे सध्या वागत आहे महाराष्ट्र मधून सतत गुजरातला प्रकल्प जात असल्याचे सांगून ते जनतेची दिशाभूल करत आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार भीमराव तापकीर यांच्या प्रचारार्थ धनकवडी येथे प्रचारसभा घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

२०१४ ते २०१९ मध्ये मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी देखील महाराष्ट्र परकीय गुंतवणूकीत प्रथम होता त्यानंतर आमच्याशी बेइमानी झाली आणि महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणूक मध्ये चौथ्या क्रमांकावर गेले. आता आमच्या काळात ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्र मध्ये होत असून गुजरात स्पर्धेत देखील कुठे नाही. त्यांना केवळ राजकारण करावयाचे असून त्यांना राज्यात परकीय गुंतवणूक होत असल्याचा अभिमान नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली.

फडणवीस म्हणाले, पुणे झोपडपट्टी मुक्त करण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. राज्यात येणारे आमच्या नवीन सरकारकडून शहरात समाविष्ट होणाऱ्या भागात अधिक क्रेडिट नोटस दिले जातील त्यातून विविध व्यवस्था निर्माण करता येतील.नवीन गाव ज्यावेळी मनपात सहभागी होईल त्यावेळी त्यांना सुरवातीचे पाच वर्ष ग्रामपंचायत कर लागेल. ज्याप्रकारे समाविष्ट गावांमध्ये सुविधा निर्माण होतील त्यानुसार मनपाचे कर लागले जातील असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
आमदार भीमराव तापकीर, भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, माजी खासदार प्रदीप रावत, शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, आरपीआय शहराध्यक्ष संजय सोनवणे,माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे,माजी उपमहापौर दिलीप बराटे , दिलीप वेडे पाटील , दीपक नागपुरे, वर्षा तापकीर, आबा शिळीमकर, अप्पा रेनुसे, राणी भोसले, प्रकाश कदम, प्रदीप धुमाळ, अश्विनी भागवत, अरुण राजवाडे, बाळासाहेब नवले, दिगंबर डवरी, सचिन मुर्हे गणेश वर्पे उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, खडकवासला मध्ये भीमराव तापकीर हे यंदा आमदारकीचा चौकार मारतील. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात सरकार आल्या नंतर वेगाने पुण्याचा चेहरा मोहरा बदलणे काम केले गेले. दिल्ली नंतर पुण्यात मेट्रो करण्याचे ठरले आणि त्यासाठी स्वतंत्र महामेट्रो स्थापन करण्यात आले. देशात सर्वाधिक वेगाने पुणे मेट्रो तयार होत आहे. देशात प्रथमच स्वारगेट येथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एकत्रित करणारी मल्टी मॉडेल हब तयार करण्यात येत आहे. खडकवासला ते खराडी दरम्यान मेट्रो मार्गास तीन दिवसात आम्ही मान्यता दिली. चांदणी चौक येथे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजनातून राज्य सरकारने भूसंपादन करून चांदणी चौक कायापालट करून वाहतूक कोंडी मधून नागरिकांची सुटका केली. एआय माध्यमातून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अनेक पर्यायी रस्ते निर्माण करण्यात येत आहे . पुण्याला एक नवीन रिंग रोड देखील मंजूर करण्यात आला असून त्याचे काम पुढील तीन वर्षात होऊन बाहेरून येणारी वाहनांची वाहतूक कोंडी सुटेल. पीएमपीएमएल माध्यमातून अनेक इलेक्ट्रिक बस पुण्यात दिल्या गेल्या आहे त्यामुळे प्रदूषण कमी होईल.

आमदार तापकीर म्हणाले, मला मतदारसंघातील जनतेने नेहमी साथ दिली आहे, पक्षाने मला चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. मतदारसंघात ग्रामीण आणि शहरी भाग आहे त्यांचा समन्वय साधून कोट्यवधी रुपये खर्च करून चांगला विकास करू शकलो आहे. शहरी भागातील समस्या सुटणे आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही मागण्या केल्या की, ते न्याय देतात. नागरीकरण या भागात वाढलेले असून वाहतूक कोंडी सुटण्यासाठी राज्य सरकारने रस्ते रुंदीकरणासाठी मदत करावी, पुण्यात समाविष्ट ३२ गावातील विकास आराखडा करून त्यांचे वाढीव कर कमी करावे. दंड आकारून घरांची गुंठेवारी होणे गरजेचे आहे त्यात सुलभता आली पाहिजे.