अहिल्यानगरमध्ये बंडखोरीला उत, विखेंची डोकेदुखी वाढणार

अहिल्यानगर, ४ नोव्हेंबर २०२४: विधानसभा निवडणुकीतील लढतीचे चित्र आज स्पष्ट झालं आहे. राज्यातील अनेक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात बंडखोरी झाली होती. मागील चार-पाच दिवसांपासून बंडोबांना थंड करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, अहिल्यानगर जिल्ह्यातील बंडखोरी शमवण्यात महायुती आणि महाविकास आघाडीला अपयश आलं. जिल्ह्यात अनेक मातब्बर नेत्यांनी आपले अर्ज मागे घेतले नसल्याने जिल्ह्यात बंडाची मोठी ठिणगी पडली.

शिर्डी, नगरमध्ये तिरंगी लढत…
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात  भाजपचे राजेंद्र पिपाडा यांनी अर्ज मागे घेतला नाही. यामुळे शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे, प्रतिभा घोगरे यांच्यासह राजेंद्र पिपाडा हे रिंगणार असणार आहेत. तर नगर शहरात सेनेच्या शशिकांत गाडे यांनी देखील बंडखोरी करत आपला उमेदवारी कायम ठेवला असल्याने नगर शहरात संग्राम जगताप, अभिषेक कळमकर यांच्यासह शशिकांत गाडे यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे

तर श्रीगोंदा मतदारसंघात देखील मोठी राजकीय घडामोड घडली आहेय आघाडीमधून ठाकरे गटाकडून अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देण्यात आली तर राष्ट्रवादीकडून माजी आमदार राहिलेले राहुल जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला असल्याने आघाडीत बिघाडी झाली. श्रीगोंद्यात विक्रम पाचपुते, सुवर्णा पाचपुते, आण्णा शेलार, अनुराधा नागवडे, राहुल जगताप यांच्यामध्ये लढत होणार आहे. विशेष म्हणजे श्रीगोंद्यात महायुतीच उमेदवार बदलण्यात आला असून प्रतिभा पाचपुते यांच्या जागी विक्रम पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाली.

शेवगावमधून महायुतीकडून मोनिका राजळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रताप ढाकणे, हर्षदा काकडे यांच्यासह माजी आमदार चंद्रशेखर घुले हे प्रमुख मैदानात आहे याठिकाणी भाजपच्या उमेदवांकडून देखील बंडाची ठिणगी टाकण्यात आली होती. मात्र मुंडे व दौंड यांनी पक्षासोबत राहण्याचे ठरवले.

पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून राणी लंके या आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार काशिनाथ दाते हे उमेदवार आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीमध्ये सुद्धा बंडाळी झाल्याचे दिसून आले आहे.