देशद्रोहाचा आरोप असणाऱ्या नवाब मलिकांच्या प्रचारावर फडणवीसांनी दिले थेट उत्तर

मुंबई, ३० ऑक्टोबर २०२४ : विधानसभा निवडणुकांसाठी अजित पवाराकडून नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजितदादांच्या या भूमिकेनंतर भाजपच्या गोटात नाराजीचा सूर असून, मलिकांचा प्रचार न करण्याची कठोर भूमिका भाजपच्या नेत्यांसह सर्वच कार्यकर्त्यांनी घेतली आहे. अजित पवारांच्या या भूमिकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त करत ही १०० टक्के समस्या असल्याचे म्हटले आहे. ते एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, भाजपच्या सर्व विरोधाला न जुमानता नवाब मलिक यांनी मुंबईतील मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. आम्ही राष्ट्रवादीला सुरुवातीलाच नवाब मलिक यांना तिकीट देऊ नका, असे स्पष्टपणे सांगितले होते, तरीही त्यांनी ते दिले आहे. हे चुकीचे आहे.

राष्ट्रवादीकडून मलिक यांना तिकीट देण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही भाजप युतीमध्ये मलिक यांचा प्रचार करणार नसल्याची जाहीर भूमिका फडणवीसांनी बोलताना मांडली आहे. मलिकांना ज्याठिकाणाहून उमेदवारी देण्यात आली आहे. तेथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाही उमेदवार असून, शिवसेनेचा उमेदवाराचे काम आम्ही करू असे फडणवीसांनी स्पष्ट केले. तसेच मलिकांना विरोध असतानाही त्यांना भाजचं का नाही ऐकले यबाबत अजित पवारांना विचारावे असे फडणवीस म्हणाले.

अणुशक्ती नगरमधून मुलगी मैदानात
नवाब मलिक हे मुंबईतील अणुशक्ती नगरचे विद्यामान आमदार असून, यंदाच्या विधानसभा निवडणुकांसाठी ही जागा मलिकांनी त्यांची मुलगी सना मलिक हिच्यासाठी सोडली असून, सना मलिक यांना अजित पवाराकडून या जागेवरून अधिकृत उमेदवारीदेखील जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून नवाब मलिकांना शेवटच्या क्षणी मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.