अजित पवारांच्या खेळीमुळे आर. आर. आबांचे पुत्र रोहित पाटलांसमोर तगडे आव्हान

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२४ : अजित पवार यांनी पुढाकार घेऊन तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात माजी खासदार संजय पाटील आणि माजी आमदार अजितराव घोरपडे यांच्यात समेट घडवून आणला आहे. पवारांच्या या खेळीमुळे दिवंगत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या समोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे.

रोहित पाटील गेल्या तीन – चार वर्षांपासून विधानसभेची तयारी करीत आहेत. रोहित पाटील यांचा जनसंपर्क चांगला तसचे प्रबळ विरोधक नसल्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक रोहित पाटील यांच्यासाठी काहिशी सोपी जाईल, असे वाटत होते. पण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीमुळे रोहित पाटील यांची कोंडी झाली आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून रोहित पाटील यांना उमेदवारी मिळणे निश्चित आहे. दुसरीकडे महायुतीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या वाट्याला गेली आहे. अजित पवारांनी ही जागा निवडून आणण्याचा चंग बांधला असून, ते भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांना ते निवडणूक रिंगणात उतरविणार आहेत.

रोहित पाटील यांचे पारडे काहिसे जड दिसत होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघात भाजपचे उमेदवार असलेले संजय पाटील पिछाडीवर होते. त्यामुळेच अजित पवार यांनी पुढाकार घेऊन माजी आमदार अजितराव घोरपडे आणि संजय पाटील यांच्यातील वाद मिटवून समेट घडवून आणला आहे. घोरपडे – पाटील यांच्यात झालेल्या समेटामुळे रोहित पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे. प्रारंभी रोहित पाटील यांच्यासाठी सोपी वाटणारी निवडणूक आता चुरशीची होणार आहे.