फडणवीसांच्या बंगल्यावर नाराजांचा ‘जनसागर’

मुंबई, २१ आॅक्टोबर २०२४ : भाजपकडून काल (दि.२०) विधानसभेसाठी पहिली ९९ जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. या यादीत अनेकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे जाहीर करण्यात आलेल्या यादीनंतर देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आज (दि.२१) नाराजांचा जनसागर उसळला आहे. पत्ता कट झालेले आणि अद्याप प्रतिक्षा यादीत असलेले इच्छुक उमेदवारांनी फडणवीसांची भेट घेत आमचं काय चुकलं? सांगा असा सूर आळवला आहे. तर, उमेदवारी घोषित झाल्यानंतर ती रद्द करून लेकाला द्यावी यासाठी आईने मुंबईकडे धाव घेतली आहे.

फडणवीसांना आतापर्यंत कोण-कोण भेटलं?

विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर नावं जाहीर झालेल्या उमेदवारांनी विजयासाठी कंबर कसली आहे. तर, दुसरीकडे पहिल्या यादीतून नाव न आल्याने आणि काहींचा पत्ता खट झाल्याने मुरजी पटेल, भारती लव्हेकर, भीमराव तापकीर, बबनराव पाचपुते यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. तर आमदार सत्यजित तांबे ‘मेघदूत’ बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते.

जाहीर करण्यात आलेल्या ९९ जणांना उमेदवारीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, घरात उमेदवारी मिळूनसुद्धा प्रतिभा पाचपुते यांनी मुंबईकडे धाव घेत फडणवीसांची भेट घेतली आहे. स्वतः ऐवजी मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत. त्यामुळं आता त्यांच्या या मागणीवर पक्षश्रेष्ठी आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सुवर्णा पाचपुते यांच्याकडून बंडाचा इशारा

श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या मतदारसंघातून भाजपच्या जुन्या पदाधिकारी सुवर्णा पाचपुते यादेखील इच्छूक होत्या. त्यामुळे प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर होताच सुवर्णा पाचपुते यांच्याकडून बंडाचा इशारा देण्यात आला आहे. भाजपने पुन्हा पाचपुते कुटुंबीयांनाच तिकीट दिल्याने त्या प्रचंड नाराज असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे उमेदवारी जाहीर न झाल्याने नाराज असणाऱ्यांनी मुंबईकडे धाव घेत फडणवीसांची भेट घेतली आहे तर, सत्यजित तांबे मात्र भंडारदरा धरण संदर्भातील काही कामे असल्याने फडणवीसांची भेट घेतली असल्याचे म्हटले आहे.