मांजराने वाघाचं झुलं घातलं म्हणजे वाघ होत नाही; लंकेंचे विखेंना खोचक प्रत्युत्तर

कोल्हापूर, १६ ऑक्टोबर २०२४ ः मांजराने वाघाचं झुलं घातलं म्हणजे तो वाघ होत नसतो, असं खोचक प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखेंना दिलंय. ते कोल्हापुरात बोलत होते. राहुरीत एका कार्यक्रमादरम्यान, सुजय विखे यांनी निलेश लंके यांचं नाव न घेता थेट इशारा दिला होता. टायगर अभी जिंदा है..या शब्दांत सुजय विखे यांनी लंकेंना इशारा दिला होता. त्यानंतर निलेश लंके यांनी प्रत्युत्तर दिलंय.

निलेश लंके बोलताना म्हणाले, जो खरा वाघ असतो तो कोणाला सांगत नसतो की मी वाघ आहे . नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातीतल लोकांनी ठरवलंय की कोण खरा टायगर आहे. एखाद्या मांजराने वाघाचं झुलं अंगावर घेतलं म्हणजे तो वाघ होतं नसतो, हे जनतेनी ठरवायंच असतं कोण खरा वाघ आहे, असा खोचक वार निलेश लंके यांनी सुजय विखेंच्या इशाऱ्यानंतर केलायं.

लंके सध्या कोल्हापुर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर माध्यमांशी संवाद साधताना निलेश लंके यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. ते म्हणाले, राज्यात कालच विधानसभा निवडणुकीसाठी आचासंहिता लागू करण्यात आलीयं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच राज्य म्हणजे महाविकास आघाडीचंच सरकार येणार असून हे सरकार बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार असणार आहे. या निवडणुकीत राज्यात बदल अटळ असल्याचंही लंके यांनी ठणकावून सांगितलंय.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध योजनांच्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आलायं. सरकारच्या योजना कशासाठी आणि किती दिवसांसाठी हे लोकांना सगळं माहिती आहे. राज्यातील जनता दुधखुळी नाही, हे फक्त निवडणुकीपुरतं गाजर दाखवण्याचं काम आहे, त्यानंतर हे सरकार जनतेला विचारणार नसल्याचं जनतेला माहिती असल्याचं निलेश लंके यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून शरद पवार गटात अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी प्रवेश केलायं. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा स्ट्राईक रेट चांगला राहिलायं. लोकसभेत जशी परिस्थिती होती, ती परिस्थिती आता वाढत चालली असून शरद पवारांसोबत गेल्यास सत्तेत बसणार असल्याचा विश्वास लोकांना आहे, त्यामुळेच पक्षप्रवेश होत असल्याचं निलेश लंकेंनी सांगितलंय.