सकल ब्राह्मण समाजाने कसब्यात भाजपचे वाढवले टेंशन

पुणे, १६ ऑक्टोबर २०२४ ः शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण समाजाची मतदारसंख्या मोठी आहे. त्यामुळे कसब्यातून ब्राह्मण समाजातील सुयोग्य व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी ‘सकल ब्राह्मण समाजा’ने भारतीय जनता पक्षाकडे केली आहे. कसबा मतदरसंघात भाजपतर्फे हेमंत रासने यांची उमेदवारी अंतिम समजली जात असताना या पत्रामुळे भाजपचे टेंशन वाढणार आहे.

परशुराम सेवा संघ, ब्राह्मण जागृती सेवा संघ, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, आम्ही सारे ब्राह्मण, चित्पावन अस्तित्व संस्था, देशस्थ ऋग्वेदी शिक्षणोत्तेजक संस्था, कऱ्हाडे ब्राह्मण संघ आदी संस्थांतर्फे सकल ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली आहे. समाजाचे समन्वयक भालचंद्र कुलकर्णी यांनी या संदर्भातील निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. काही दिवसांपूर्वीच हे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. यापूर्वी कसबा मतदारसंघात मुक्ता टिळक, गिरीश बापट, अण्णा जोशी व डॉ. अरविंद लेले अशांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे, याची भाजपने विशेषत्वाने दखल घ्यावी. ब्राह्मण समाजाने कायमच भाजपला साथ दिलेली आहे, यादृष्टीने या मागणीचा जरुर विचार व्हावा, असे या निवेदनात म्हटले आहे.धर्म-जात-पंथ अशा सर्वच आघाड्यांवर यंदाची निवडणूक अधिकच गाजणार असे दिसू लागले आहे. जातीनिहाय आरक्षणांमुळे जाती- पातींची अस्मिता अधिकच गडद होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत हिंदुत्वाचा आवाज काहीसा क्षीण होऊ लागला आहे. भाजप व शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांनी सर्वसमावेशक धोरण अवलंबतांना ब्राह्मण समाजाला देखील प्राधान्य दिले आहे. नुकतेच ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ देखील महायुती सरकारने मंजूर केले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील ब्राह्मणबहुल किमान ३० विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण समाजाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी दोन्ही पक्षांकडे पूर्वीच करण्यात आली आहे, असे निवेदनात नमूद आहे.